Sharad Pawar Resigns Updates | सुप्रिया सुळेंच्या नावाला राहुल गांधींची पसंती?, राष्ट्रवादीतील घडामोडींवर केली चर्चा | पुढारी

Sharad Pawar Resigns Updates | सुप्रिया सुळेंच्या नावाला राहुल गांधींची पसंती?, राष्ट्रवादीतील घडामोडींवर केली चर्चा

पुढारी ऑनलाईन : शरद पवार यांच्यानंतर राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदी सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांचे नाव जवळपास निश्चित झाले आहे. राष्ट्रवादीतील या घडामोडींवर काँग्रेसची भूमिका समोर आली आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी सुप्रिया सुळे यांच्याशी चर्चा केली असल्याची माहिती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी दिली आहे. राहुल गांधी हे अनुभवी नेते आहेत आणि सुप्रिया सुळे यांना आपण कशी मदत करू शकता हे विचारण्यासाठी ते त्यांच्याशी बोललो आहेत, असे नाना पटोले यांनी सांगितले आहे. (Sharad Pawar Resigns Updates)

सुप्रिया सुळे यांच्याकडेच सूत्रे?

राष्ट्रवादीची राष्ट्रीय धुरा ही खासदार सुप्रिया सुळे यांच्या खांद्यावर देण्यात येणार असल्याची चर्चा आहे; तर राज्याची धुरा ही अजित पवार यांच्याकडे देण्यात येईल, असे बोलले जात आहे. मात्र, प्रफुल्ल पटेल, जितेंद्र आव्हाड यांनी ही शक्यता फेटाळून लावली आहे. पटेल म्हणाले, शरद पवार यांनीच अध्यक्ष राहावे, ही आमची भूमिका आहे. त्यांचे मन वळविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यांचा राजीनामा मंजूर करण्याबाबत कोणताही निर्णय झालेला नाही. त्यामुळे तुम्ही अंदाज बांधू नका.

आपण अध्यक्षपदाच्या स्पर्धेतही नाही आणि आपली तशी इच्छाही नाही, असे त्यांनी सांगितले. जितेंद्र आव्हाड यांनीही सुप्रिया सुळे यांच्या अध्यक्ष निवडीचा कोणताही प्रस्ताव नसल्याचे सांगितले. आमच्या पक्षाचे निर्णय आम्ही घेत असतो. माध्यमांनी त्याबाबत निर्णय घेऊ नयेत, असे सांगून आव्हाड म्हणाले, शरद पवार यांना बघून आम्ही राजकारणात आलो आणि एवढी वर्षे राजकारण करत आहोत. तेच जर राजकारणात राहणार नसतील, तर आम्ही तरी कशाला राजकारण करायचे, अशी आमची भूमिका आहे. आमच्या भूमिकेचा विचार शरद पवार यांना करावा लागेल, असेही त्यांनी सांगितले. पवार हे माझ्यासारख्या कार्यकर्त्यांचे मायबाप आहेत. ते पक्षातील लाखो कार्यकर्त्यांना असे वार्‍यावर सोडून दूर होणार नाहीत, असे आव्हाड म्हणाले. तसेच पवार यांनी राजीनामा मागे घ्यावा म्हणून आपण पक्षातील आपल्या पदाचा राजीनामा दिला असल्याचे आव्हाड यांनी स्पष्ट केले.

 हे ही वाचा :

Back to top button