Sharad Pawar Resigns Updates | सुप्रिया सुळे राष्ट्रवादीच्या नव्या अध्यक्ष, अजित पवार मुख्यमंत्रीपदाचा चेहरा?

Sharad Pawar Resigns Updates | सुप्रिया सुळे राष्ट्रवादीच्या नव्या अध्यक्ष, अजित पवार मुख्यमंत्रीपदाचा चेहरा?
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन : राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदावरुन निवृत्तीच्या निर्णयावर शरद पवार ठाम आहेत. आता राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदी शरद पवार यांच्या कन्या आणि बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांचे नाव जवळपास निश्चित मानले जात आहे. सुप्रिया सुळे २०२४ च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत पक्षाचे नेतृत्व करतील. तर अजित पवार मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून राज्याची धुरा सांभाळतील, यावर राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांचे एकमत झाल्याचे वृत्त द टाइम्स ऑफ इंडियाने दिले आहे. (Sharad Pawar Resigns Updates)

काल बुधवारी राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांनी बुधवारी बंद दाराआड बैठका घेतल्या आणि शरद पवार त्यांच्या निर्णयावर ठाम राहिल्यास त्यांच्यानंतर अध्यक्ष कोण येणार यावर बैठकीत निर्णय झाल्याचे समजते. आता केवळ त्यांच्या नावांची अधिकृत घोषणा बाकी आहे. सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रीय पातळीवर पक्षाचे नेतृत्व करावे आणि अजित यांनी राज्यातील राजकारणावर लक्ष केंद्रित करावे आणि ते पक्षाचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा असतील, असे राष्ट्रवादीतील वरिष्ठ नेत्यांचा सूर आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला बहुमत मिळाल्यास अजित पवार मुख्यमंत्रिपदासाठी सर्वसहमतीचे उमेदवार असतील. त्यांनी राज्यातील राजकीय बाबींवर लक्ष केंद्रित करावे, असा राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेत्यांचे सर्वसाधारण मत आहे.

सुरुवातीला यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये बुधवारी झालेल्या चर्चेदरम्यान राज्यसभा खासदार प्रफुल्ल पटेल आणि सुप्रिया सुळे यांची नावे अध्यक्षपदासाठी विचारात घेण्यात आली होती. मात्र, पटेल यांनी आपण अध्यक्षपदाच्या शर्यतीत नसल्याचे स्पष्ट केले आहे.

विशेष म्हणजे बुधवारच्या बैठकीला शरद पवार यांच्यासह राष्ट्रवादीचे बहुतांश नेते उपस्थित होते. पण या बैठकीला प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील उपस्थित नव्हते. सुरुवातीला जयंत पाटील यांचे नाव अध्यक्षपदासाठी आघाडीवर होते. जयंत पाटील का उपस्थित नव्हते यावर सांगताना प्रफुल्ल पटेल म्हणाले की, पाटील हे पुण्यातील साखर सहकारी संस्थेच्या नियोजित बैठकीत होते. पण जयंत पाटील यांनी वाय. बी. चव्हाण सेंटरमधील बैठकीचे आपल्याला निमंत्रण नसल्याचे स्पष्ट केले होते.

शरद पवार यांनी बैठकीत सांगितले आहे की, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नवीन अध्यक्षाच्या निवडीसाठी स्थापन केलेल्या समितीची बैठक ६ मे ऐवजी ५ मे रोजी घेण्यात यावी. "राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदावरून पायउतार होण्याचा एवढा मोठा निर्णय घेण्यापूर्वी मी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांशी सल्लामसलत करायला हवी होती. पण मी आधी त्यांच्याशी सल्लामसलत केली असती तर त्यांनी या निर्णयास विरोध केला असता," असे त्यांनी म्हटले आहे. (Sharad Pawar News)

सुप्रिया सुळे यांच्याकडेच सूत्रे?

राष्ट्रवादीची राष्ट्रीय धुरा ही खासदार सुप्रिया सुळे यांच्या खांद्यावर देण्यात येणार असल्याची चर्चा आहे; तर राज्याची धुरा ही अजित पवार यांच्याकडे देण्यात येईल, असे बोलले जात आहे. मात्र, प्रफुल्ल पटेल, जितेंद्र आव्हाड यांनी ही शक्यता फेटाळून लावली आहे. पटेल म्हणाले, शरद पवार यांनीच अध्यक्ष राहावे, ही आमची भूमिका आहे. त्यांचे मन वळविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यांचा राजीनामा मंजूर करण्याबाबत कोणताही निर्णय झालेला नाही. त्यामुळे तुम्ही अंदाज बांधू नका.

आपण अध्यक्षपदाच्या स्पर्धेतही नाही आणि आपली तशी इच्छाही नाही, असे त्यांनी सांगितले. जितेंद्र आव्हाड यांनीही सुप्रिया सुळे यांच्या अध्यक्ष निवडीचा कोणताही प्रस्ताव नसल्याचे सांगितले. आमच्या पक्षाचे निर्णय आम्ही घेत असतो. माध्यमांनी त्याबाबत निर्णय घेऊ नयेत, असे सांगून आव्हाड म्हणाले, शरद पवार यांना बघून आम्ही राजकारणात आलो आणि एवढी वर्षे राजकारण करत आहोत. तेच जर राजकारणात राहणार नसतील, तर आम्ही तरी कशाला राजकारण करायचे, अशी आमची भूमिका आहे. आमच्या भूमिकेचा विचार शरद पवार यांना करावा लागेल, असेही त्यांनी सांगितले. पवार हे माझ्यासारख्या कार्यकर्त्यांचे मायबाप आहेत. ते पक्षातील लाखो कार्यकर्त्यांना असे वार्‍यावर सोडून दूर होणार नाहीत, असे आव्हाड म्हणाले. तसेच पवार यांनी राजीनामा मागे घ्यावा म्हणून आपण पक्षातील आपल्या पदाचा राजीनामा दिला असल्याचे आव्हाड यांनी स्पष्ट केले. (Sharad Pawar resigns)

हे ही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news