Tillu Tajpuriya Murder : तिहार जेलमध्ये गँगस्टर टिल्लू ताजपुरियाची हत्या; रोहिणी कोर्ट गोळीबारात होता मुख्य आरोपी | पुढारी

Tillu Tajpuriya Murder : तिहार जेलमध्ये गँगस्टर टिल्लू ताजपुरियाची हत्या; रोहिणी कोर्ट गोळीबारात होता मुख्य आरोपी

पुढारी ऑनलाईन डेस्क : देशातील सर्वात सुरक्षित तुरुंग म्हणून ओळखणाऱ्या तिहार तुरुंगात कुख्यात गॅंगस्टर टिल्लू ताजपुरिया याची मंगळवारी सकाळी चार अन्य कैद्यांनी निर्घृण हत्या केली. याआधी याच तुरुंगात काही दिवसांपूर्वी गॅंगस्टर प्रिन्स तेवतिया याला टोळीयुध्दातून संपविण्यात आले होते. सुनील मान उर्फ टिल्लू ताजपुरिया याच्या हत्येमुळे तिहार तुरुंगाची सुरक्षा चव्हाट्यावर आली आहे.

गॅंगस्टर जितेंद्र गोगी याच्या हत्येचा बदला म्हणून ताजपुरिया याचा गेम करण्यात आल्याचे मानले जात आहे. ग्रील कापून मारेकरी कैदी पहिल्या मजल्यावरून खालच्या मजल्यावर चादरीच्या सहाय्याने उतरले. नंतर वारंवार पोटात लोखंडी रॉड खुपसून टिल्लू ताजपुरिया याचा गेम करण्यात आला. ताजपुरिया याच्या हत्येनंतर दिल्ली व उत्तर भारतातील टोळीयुध्द भडकण्याची शक्यता निर्माण झाली आहे. टिल्लू ताजपुरिया हा रोहिणी न्यायालयातील गोळीबार प्रकरणातला आरोपी होता. रोहिणी न्यायालयात जितेंद्र गोगी याची हत्या करण्यात आली होती. यावेळी पोलिसांनी दिलेल्या प्रत्युत्तरात दोन्ही मारेकरी ठार झाले होते. ताजपुरिया हा आधी मंडावली तुरुंगात बंद होता. पण गोगीची हत्या झाल्यानंतर त्याला तिहार तुरुंगात हलविण्यात आले होते.

ताजपुरिया याला मारणारे चारही कैदी पहिल्या मजल्यावरील 9 क्रमांकाच्या तुरुंगात बंद होते. रात्री ग्रील कापल्यानंतर सकाळी त्यांनी ताजपुरिया याच्यावर हल्ला चढविला. गोगी टोळीतील रियाज, राजेश, योगेश टुंडा व दीपक तीतर नावाच्या गुंडांनी ही हत्या केल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. जितेंद्र गोगीचा जवळचा साथीदार रोहित मोई याने हा हल्ला घडवून आणला असावा, या शक्यतेनेही पोलिस तपास करीत आहेत. मोई हा तिहारमध्येच बंद आहे. गोगी, संदीप उर्फ काला जठेडी आणि लॉरेन्स बिष्णोई हे तिन्ही गँग एकत्र काम करतात. गोगी टोळीची सूत्रे सध्या दीपक बॉक्सर याच्याकडे आहेत. अलिकडेच बॉक्सरला मेक्सिकोमध्ये पकडून भारतात आणण्यात आले होते.

हेही वाचा : 

Back to top button