आतिक अहमदचा सहकारी गुड्डू मुस्लीम गोव्यात लपल्याची शक्यता; पोलीस यंत्रणा सतर्क | पुढारी

आतिक अहमदचा सहकारी गुड्डू मुस्लीम गोव्यात लपल्याची शक्यता; पोलीस यंत्रणा सतर्क

पणजी: पुढारी वृत्तसेवा : उत्तर प्रदेशातील गँगस्टर व प्रयागराज येथे मारला गेलेला गुंड आतिक अहमद याचा सहकारी गुड्डू मुस्लीम हा गोव्यात लपल्याचे वृत्त एका राष्ट्रीय वृत्तवाहिनीने दिले आहे. त्यामुळे गोव्याची पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे.

गुड्डू मुस्लीम हा आतिक अहमद याचा सहकारी असून प्रयागराजमध्ये त्याच्यावर अनेक गुन्हे नोंद आहेत. आतिक अहमद व त्याचा भाऊ अशरफ अहमद यांना ठार मारण्यात आले आहे. आतिक अहमदची पत्नी शाईस्ता परवीन ही सध्या फरारी आहे. तसेच काही दिवसांपूर्वी बॉम्बफेक केल्याप्रकरणी गुड्डू मुस्लीम याचा पोलीस शोध घेत आहेत. गुड्डू हा गोव्यात लपला असल्याचे वृत्त वृत्तवाहिनीने दिले आहे. त्याचा शोध घेण्यासाठी उत्तर प्रदेशचे पोलीस गोव्यात येणार असल्याचे वृत्त प्रसारित झाल्यानंतर गोवा पोलीस सतर्क झाली आहे.
दरम्यान, यापूर्वीही गोव्यात अनेक गुन्हेगार लपल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे उत्तर प्रदेश पोलिसांच्या भीतीने गुड्डू मुस्लीम गोव्यात येऊन लपण्याची शक्यता नाकारता येत नाही.

अद्याप माहिती नाही : पोलीस अधीक्षक

गुड्डू मुस्लीम गोव्यात लपला असल्याचे वृत्त प्रसारित झाले असले तरी अद्याप उत्तर प्रदेश पोलिसांकडून गोवा पोलिसांना याबाबत कोणताही संदेश आलेला नाही. याबाबत काही सूचना आल्यास उत्तर प्रदेश पोलिसांना योग्य ते सहकार्य केले जाईल, असे उत्तर गोवा पोलीस अधीक्षक निधीन वाल्सन यांनी म्हटले आहे.

हेही वाचा 

Back to top button