आयपीएल क्रिक्रेट सट्ट्याचे गोवा कनेक्शन; एकजण गोव्यातून, तर दोघांना अमरावतीतून अटक | पुढारी

आयपीएल क्रिक्रेट सट्ट्याचे गोवा कनेक्शन; एकजण गोव्यातून, तर दोघांना अमरावतीतून अटक

अमरावती; पुढारी वृत्तसेवा : शहरातील आयपीएल क्रिक्रेट सट्ट्याचे तार गोव्यापर्यंत जुळले असल्याची माहिती आरोपींच्या चौकशीतून पुढे आली आहे. बुधवारी (दि. १९) अमरावती शहर पोलिसांनी राजापेठ हद्दीतील आयपीएल क्रिक्रेट सट्ट्याच्या गुन्ह्यात राजु ठाकुरदास बागडी (४३, रा. नालंदा कॉलनी, साई नगर) या आरोपीला गोव्यातून अटक केली, तर फ्रेजरपुरा ठाण्यातील एका गुन्ह्यात आरोपी असणारे आयुश नरेंद्र शर्मा (२६, रा. पुष्पक कॉलनी) व करण राजेश गुप्ता (२६, रा. मसानगंज) या दोघांना गोव्यावरून अमरावतीत परत येताच मसानगंज परिसरातून ताब्यात घेतले. पोलिसांनी आरोपी राजू बागडीच्या ताब्यातून ९४ हजार रुपये किमंतीचे पाच मोबाईल आणि आयुश शर्मा व करण गुप्ताच्या ताब्यातून एका चार चाकी वाहनासह इतर साहित्य असा एकुण १५ लाख २ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईमुळे क्रिक्रेट

सामन्यावर खायवाडी व लगवाडी करणार्यांचे धाबे दणाणले आहेत. फ्रेजरपुरा पोलिस ठाण्यात दाखल आयपीएल क्रिक्रेट सट्ट्याच्या गुन्ह्यातील वॉन्टेड आरोपींचा शोध पोलिस घेत होते. दरम्यान आरोपी आयुष शर्मा व करण गुप्ता हे दोघेही गोव्यावरून अमरावती परत येत असल्याची माहिती अमरावती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी या दोन्ही आरोपींना त्यांच्या मसानगंज परिसरातील घरातून ताब्यात घेतले. पोलिसांची त्यांची चौकशी केली असता, ते अमरावती शहरात मोठ्या प्रमाणात खायवाडी व लगवाडी करीत असल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी दोघांच्याही बॅगमधून विविध कंपनीचे चार मोबाईल, आठ साधे मोबाईल, पाच कॅल्कुलेटर, सहा वेगवेगळ्या कंपनीचे क्रेडीट व डेबीट कार्ड, पाच हिशोबाचे रजिस्टर्स, ५० हजाराची रोख व १२ लाख रुपये किमंतीचे एक चारचाकी वाहन जप्त केले. या दोघांनाही फ्रेजरपुरा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. दोघांचीही पोलिस कोठडीत चौकशी केल्यानंतर त्यांना गुरुवारी न्यायालयात हजर केले जाणार आहे.

राजू बागडीकडून पाच मोबाईल जप्त

राजापेठ पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या क्रिक्रेट सट्ट्यातील एका गुन्ह्यात एपीआय महेंद्र इंगळे व पोलीस कर्मचारी संग्राम भोजने यांनी माहिती काढली असता. राजु बागडी नामक आरोपी हा गोव्यात असल्याची बाब पुढे आली. या माहितीवरून पोलिसांनी आरोपी राजु बागडीला गोव्यातील चार्वी रिम्झ स्थित अंजना ब्रिजजवळून अटक केली. त्यावेळी त्याच्याजवळ क्रिक्रेट बेटींगकरिता वापरण्यात येणारे साहित्य मिळून आले. त्यामुळे पोलिसांनी बेटींगकरिता वापरणारे तीन अॅन्ड्राईड मोबाईल व दोन साधे मोबाईल जप्त केले. राजू बागडीला पुढील चौकशीकरिता राजापेठ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

मनीलॉड्रींगशी कनेक्शन?

अमरावती शहरात आतापर्यंत क्रिक्रेट सट्ट्याचे सात गुन्हे दाखल झाले आहेत. विविध प्रकारचे मोबाईल अॅप वापरून ऑनलाईन आयडीच्या माध्यमातून हा क्रिक्रेट सट्टा खेळल्या जात असल्याचे आढळून आले आहे. आता पोलिसांनी एका आरोपीला गोव्यातून अटक केली आहे. त्यामुळे अमरावतीमधील क्रिक्रेट सट्ट्याचे जाळे हे गोव्यापर्यंत पसरले असल्याचे दिसून येत आहे. परंतू या सट्ट्यातील पैसा जातो तरी कुठे? ही बाब अद्याप स्पष्ट झालेली नाही. परंतू हा पैसा मनिलॉन्ड्रींगमध्ये वापरल्या जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. या अनुषंगाने संबंधित विभागासह आयकर विभागाला माहिती देणार आहे.

आयपीएल क्रिक्रेट सट्टा प्रकरणात आतापर्यंत ७ गुन्हे नोंदविण्यात आले आहे. याचे कनेक्शन गोव्यापर्यंत आहे. या सट्ट्यातील पैसा मनी लॉन्ड्रींगसाठी वापर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे यासंबंधित माहिती संबंधित विभागासह आयकर विभागाला सुध्दा देण्यात येईल.

-नवीनचंद्र रेड्डी, पोलिस आयुक्त

 

Back to top button