Ludhiana gas leak : लुधियाना हादरले, गॅस दुर्घटनेतील मृतांची संख्या ११ वर | पुढारी

Ludhiana gas leak : लुधियाना हादरले, गॅस दुर्घटनेतील मृतांची संख्या ११ वर

पुढारी ऑनलाइन डेस्क : पंजाबमधील लुधियानाच्या ग्यासपुरा भागात गॅस गळतीमुळे ११ जणांचा मृत्यू झाला आहे, तर ४ हून अधिक लोक बेशुद्ध आहेत. मृतांमध्ये पाच महिला व सहा पुरुषांचा समावेश आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस आणि अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. ही घटना आज सकाळी आठच्या सुमारास ग्यासपूर रोड, सितारा सिनेमा हॉलच्या जवळ घडली.

लुधियानाच्या उपायुक्त सुरभी मलिक यांनी घटनेची माहिती दिली. मलिक म्हणाल्या की, “सरकारने मृत्युमुखी पडलेल्यांसाठी २ लाख रुपये तर जखमींना ५० हजार रुपये आणि आवश्यक सर्व वैद्यकीय मदत जाहीर केली आहे.” लुधियानाचे पोलिस आयुक्त मनदीप सिंग सिद्धू म्हणाले, “एका कुटुंबातील 5 सदस्यांसह 11 जणांचा मृत्यू झाला आहे. इतर चार जण रुग्णालयात दाखल आहेत. त्यांची प्रकृती गंभीर आहे. आम्ही संबंधित पोलस ठाण्यात गुन्हा दाखल करत आहोत. एनडीआरएफकडून गॅसचे नमुने घेतले जातील, तो कोणत्या प्रकारचा गॅस होता, ते निश्चित करतील. मृतांच्या रक्ताचे नमुनेही घेतले जात आहेत. डॉक्टरांचे म्हणणे आहे की, गॅसचा त्यांच्या फुफ्फुसावर नाही तर मेंदूवर परिणाम झाला आहे.”

दुर्घटनेतील मृतांचे मृतदेह लुधियाना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले आहेत. संपूर्ण परिसर सील करण्यात आला असून बचाव पथके प्रत्येक घराची तपासणी करत आहेत. दरम्यान, घटनास्थळी असलेल्या आमदार राजिंदरपाल कौर छिना यांची प्रकृतीही खालावली आहे. त्यांनाही रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याशिवाय बचावकार्यात गुंतलेले चार पोलीस कर्मचारीही बेशुद्ध झाले. त्या कर्मचाऱ्यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे पोलिस आयुक्तांनी सांगितले.

हेही वाचा : 

Back to top button