पुतिन यांच्‍याविरुद्ध होऊ शकते ‘लष्करी बंड’! : माजी रशियन कमांडरचा इशारा | पुढारी

पुतिन यांच्‍याविरुद्ध होऊ शकते 'लष्करी बंड'! : माजी रशियन कमांडरचा इशारा

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : रशियाचे अध्‍यक्ष व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) यांच्या विरोधात लष्करी बंड होऊ शकते. रशियात सत्तांतर करण्‍यासाठी वॅग्‍नर ग्रुप प्रयत्‍नात आहे, असा इशारा रशियाचे माजी कमांडर इगोर गिरकिन यांनी दिला आहे. युक्रेनमधील बाखमुत येथील सैन्‍य मागे घेतले जाईल, अशी धमकी नुकतीच वॅग्‍नर ग्रुपचे प्रमुख येवेगेनी प्रिगोझिन यांनी दिली आहे. अध्‍यश्र पुतिन यांच्‍याकडून रशियन सैनिकांना कोणतीही मदत मिळत असल्‍याचा आरोपही त्‍यांनी केला आहे.

रशियातील माध्‍यमांशी बोलताना रशियाचे माजी कमांडर इगोर गिरकिन यांनी म्‍हटलं आहे की, “वॅग्‍नर ग्रुपचे प्रमुख प्रिगोझिन यांनी रशियन संरक्षण मंत्रालयावर जाहीर टीका केली आहे. युक्रेनमधून सैन्‍य मागे घेण्‍याबाबत ते आग्रही आहेत. दारूगोळा पुरवठ्यावरून रशियाच्या लष्करी नेतृत्वाला ब्लॅकमेल करत आहेत. लष्‍करातील वरिष्‍ठ अधिकार्‍यांशी चर्चा न करताच त्‍यांनी युक्रेनमधून सैन्‍य मागे घेतले तर ते लष्करी बंड मानले जाईल. त्‍यांची ही कृती रशियासाठी खूपच घातक ठरेल.”

प्रिगोझिन एकेकाळी होते Vladimir Putin यांचे निकटवर्ती

पुतिन यांच्याविरोधात लष्करी बंड करण्‍याच्‍या प्रयत्‍नात असल्‍याचा प्रिगोझिन यांच्‍यावर आरोप आहे. ते एकेकाळी पुतीन यांचे निकटवर्ती मानले जात. रशियन कट्टरवाद्यांमध्ये ते खूपच लोकप्रिय आहेत. युक्रेनमधील प्रदीर्घ युद्धामुळे पुतिन यांनाही टीकेला सामोरे जावे लागत आहे. अशा परिस्थितीत बंडखोर गट प्रिगोझिन त्‍याच्‍याकडे नवे नेतृत्त्‍व म्‍हणून पाहत आहे.

रशिया-युक्रेनियन युद्धात बाखमुतमध्ये भीषण लढाई सुरू आहे. बखमुत येथे सुरुवातीला रशियन सैन्‍याला यश मिळाले मात्र काही दिवसांनी सैन्‍य पिछाडीवर पडले. युक्रेनच्‍या सैन्‍याने दिलेल्‍या सडेतोड प्रत्‍युत्तरामुळे रशियन सैनिक जेरीला आले आहेत. रशिया युक्रेनच्या लष्करी लक्ष्यांवर हवाई हल्ले करणे सुरुच ठेवले आहे.

हेही वाचा :

 

 

Back to top button