Wrestlers vs WFI | मी निर्दोष, राजीनामा देणार नाही : WFI अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह | पुढारी

Wrestlers vs WFI | मी निर्दोष, राजीनामा देणार नाही : WFI अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह

पुढारी ऑनलाईन : महिला कुस्तीपटूंवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप असलेले भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष (डब्ल्यूएफआय) बृजभूषण शरण सिंह यांनी आज आपण राजीनामा देणार नसल्याचे स्पष्ट केले. मी निर्दोष आहे आणि चौकशीला सामोरे जाण्यास तयार आहे. मी तपास यंत्रणेला सहकार्य करणार आहे. माझा न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे आणि मी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा आदर करतो, असेही त्यांनी म्हटले आहे. (Wrestlers vs WFI)

राजीनामा देणे ही काही मोठी गोष्ट नाही. मी गुन्हेगार नाही. मी राजीनामा दिला तर त्याचा अर्थ असा होईल की मी कुस्तीपटूंचे आरोप मान्य केले आहेत. माझा कार्यकाळ जवळपास संपत आला आहे. सरकारने ३ सदस्यीय समिती स्थापन केली आहे. ४५ दिवसांत निवडणुका होणार असून निवडणुकीनंतर माझा कार्यकाळ संपणार असल्याचे बृजभूषण शरण सिंह यांनी म्हटले आहे. (Wrestlers vs WFI)

बृजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात कथित आरोपाप्रकरणी दिल्ली पोलिसांत एफआयआर दाखल करण्यात आला आहे. भारतीय महिला कुस्तीपटूंच्या तक्रारीनंतर दिल्लीतील कनॉट प्लेस पोलिस स्थानकात दोन एफआयआर नोंदवण्यात आले. पहिला एफआयआर अल्पवयीन मुलीद्वारे करण्यात आलेल्या आरोपसंदर्भात आहे. याच प्रकरणात पोक्सो अंतर्गतही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर दूसरा एफआयआर महिला कुस्तीपटूंनी दिलेल्या तक्रारीच्या नोंदवण्यात आधारे आला आहे. दोन्ही प्रकरणांत गंभीर दखल घेण्यात आली आहे.

बृजभूषण शरण सिंह यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला जाईल,अशी माहिती दिल्ली पोलिसांनी शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयात दिली होती. महिला कुस्तीपटूंनी सिंह यांच्याविरोधात लैंगिक अत्याचाराची तक्रार केल्यानंतर याप्रकरणात गुन्हा दाखल करण्याची मागणी करणारी याचिका न्यायालयात दाखल केली होती. यावर न्यायालयाने सुनावणी घेतली. दरम्यान सरन्यायाधीशांनी महिला कुस्तीपटूंना सुरक्षा पुरवण्याचे निर्देश देखील पोलिसांना दिले आहे. पदकविजेते अनेक कुस्तीपटू आठवड्याभरापासून जंतर-मंतरवर सिंह यांच्याविरोधात आंदोलन करीत आहेत.

कुस्तीपटूंनी महासंघाचे अध्यक्ष तसेच भाजप खासदार सिंह यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी करीत तात्काळ सुनावणीसाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाने याप्रकरणात पोलिसांना नोटीस बजावत अद्याप गुन्हा का दाखल करण्यात आला नाही? अशी विचारणा केली होती. सुनावणी दरम्यान कुस्तीपटूंच्या तक्रारीच्या आधारे डब्ल्यूएफआय प्रमुखांविरोधात गुन्हा दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला असून शुक्रवारी गुन्हा दाखल केला जाईल, अशी माहिती सॉलिसिटर जनरल तुषार मेहतांनी न्यायालयाला दिली.

सिंह यांच्या विरोधात जानेवारीत कुस्तीपटू पहिल्यांदा रस्त्यावर उतरले होते. पंरतु, क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांच्या आश्वासनानंतर त्यांनी आंदोलन मागे घेतले होते. मात्र, अद्याप कुठलीही कारवाई न झाल्यामुळे कुस्तीपटू पुन्हा आंदोलनावर बसले आहेत.

 हे ही वाचा :

Back to top button