प्रियांका गांधींनी घेतली कुस्तीपटूंची भेट, बृजभूषण सिंह यांना अटक होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार | पुढारी

प्रियांका गांधींनी घेतली कुस्तीपटूंची भेट, बृजभूषण सिंह यांना अटक होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी ‍वधेरा यांनी शनिवारी सकाळी जंतर-मंतरवर भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष (डब्ल्यूएफआय) बृजभूषण शरण सिंह यांच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या कुस्तीपटूंची भेट घेतली. सिंह यांच्यावर गुन्हा दाखल झाला असूनही खेळाडू आंदोलनावर ठाम आहेत. जोपर्यंत सिंह यांना अटक होणार नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार आंदोलकांनी घेतला आहे.

दरम्यान, प्रियांका गांधी-वधेरा यांनी आंदोलकांची भेट घेत त्यांच्यासोबत चर्चा केली. बराच वेळपर्यंत त्या आंदोलनस्थळी उपस्थित होत्या. यावेळी काँग्रेस नेते दीपेंद्र हुड्डा देखील हजर होते. महिला कुस्तीपटूंसोबत चर्चा करतांना प्रियांका गांधी भावूक झाल्याच्या दिसून आल्या. न्याय मिळवून देण्याचे आश्वासन यावेळी त्यांनी आंदोलकांना दिल्याचे कळतेय.

प्रसार माध्यमांसोबत बोलतांना त्या म्हणाल्या, सिंह यांच्या विरोधात दोन गुन्हे दाखल करण्यात आले असले तरी त्याची कॉपी देण्यात आलेली नाही. गुन्हे दाखल झाले तर त्याची प्रत का दिली नाही? सिंह यांच्याविरोधात तपास सुरू आहे, असे असताना त्यांनी अद्याप राजीनामा का दिला नाही? असे सवाल त्यांनी उपस्थित केला. अध्यक्ष असल्याने ते दबाब आणू शकतात, अनेक खेळाडूंची भविष्य खराब करू शकतात, असे देखील प्रियांका गांधी म्हणाल्या. प्रकरणाची निष्पक्ष तपास करण्याची तसेच सिंह यांच्या राजीनाम्याची मागणी त्यांनी केली. बृजभूषण पदावर असेपर्यंत निष्पक्ष तपास होवू शकत नाही, असे देखील त्यांनी स्पष्ट केले.

अनेक महिला खेळाडू आहेत त्यांच्यावर अन्याय झाला आहे. पण सरकार सिंह यांना का वाचवत आहे? पंतप्रधानांकडून कुठलीही अपेक्षा नाही. पदक विजेत्यांना ते घरी बोलावतात, आता का बोलवत नाही? सिंह यांना वाचवण्याचा एवढा प्रयत्न का केला जात आहे? असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला. यापूर्वी देखील प्रियांका गांधी यांनी ट्विटर वरून खेळाडूंच्या मुद्द्यावर मोदी सरकारवर निशाणा साधला होता.

दिल्ली पोलिसांवर गंभीर आरोप

दिल्ली पोलिसांवर दबाब असल्याचा आरोप पदक विजेते बजरंग पुनिया यांनी केला. काही साहित्य आंदोलनस्थळी आणायचे होते परंतु, पोलिसांनी त्यासाठी परवानगी दिली नाही असा आरोप त्यांनी केला. जंतरमंतरवर सामान आणणाऱ्यांना पोलीस मारहाण करीत हाकलून लावत असल्याचा आरोपही पुनिया यांनी केला.

Back to top button