पुढारी ऑनलाईन: गेल्या महिन्यात रामनवमी दरम्यान बंगालच्या काही शहरात धार्मिक तेड निर्माण झाली होती, यामुळे पश्चिम बंगालमधील हावडा आणि दालखोला जिल्ह्यात आणि पश्चिम बंगालच्या इतर भागात हिंसाचार (Violence In West Bengal) उसळला होता. यानंतर पश्चिम बंगाल पोलिसांनी अनेकांना ताब्यात घेत कारवाई केली होती. याप्रकरणी दाखल याचिकेवर कोलकत्ता न्यायालयात सुनावणी सुरू होती. दरम्यान ही याचिका स्विकारत कोलकत्ता न्यायालय पश्चिम बंगाल हिंसाचार प्रकरण आज (दि.२७) NIA कडे सोपवले आहे, याचे वृत्त एएनआयने दिले आहे.
भाजपचे नेते सुवेंदू अधिकारी यांनी राम नवमी दरम्यान झालेल्या हिंसाचार प्रकरणी (Violence In West Bengal) कोलकत्ता उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेच्या माध्यमातून हिंसाचारग्रस्त भागात केंद्रीय सुरक्षा दल तैनात करावे तसेच हिंसाचाराची चौकशी राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए ) करावी, अशी मागणी त्यांनी केली होती. या याचिकेतून केलेली मागणी स्विकारत, उच्च न्यायालयाने पश्चिम बंगालमधील हिंसाचार प्रकरण एनआयए (NIA) या राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे सोपवण्यात येत असल्याचे सांगण्यात आले आहे.
हावडा येथील शिबपूरमध्ये तणावात्मक वातावर निर्माण झाले होते. यानंतर हावडा येथील हिंसाचारप्रकरणी ३६ जणांना अटक करण्यात आलीहोती, अशी माहिती ॲटर्नी जनरल एसएन मुखर्जी यांनी सुनावणी दरम्यान दिली होती. हुगळीतील रिश्रामध्ये झालेल्या हिंसाचाराचाही याचिकेत उल्लेख करण्यात आला आहे.