‘ती’ मृत अर्भके स्त्री जातीची, शवविच्छेदन अहवाल प्राप्त; आठवड्यानंतरही तपासात प्रगती नाही | पुढारी

‘ती’ मृत अर्भके स्त्री जातीची, शवविच्छेदन अहवाल प्राप्त; आठवड्यानंतरही तपासात प्रगती नाही

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : दोन नवजात अर्भकांचे भटक्या कुत्र्यांकडून लचके तोडत असतानाचे प्रकरण सीपीआरच्या आवारात उघडकीस आले होते. दोन्ही अर्भके स्त्री जातीची असल्याचे शवविच्छेदन अहवालातून स्पष्ट झाल्याची चर्चा आहे. मात्र त्याबाबतची अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. त्याच दिशेने तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

दोन्ही अर्भके वेगवेगळ्या महिन्यातील आहेत का? जुळी आहेत का? याचाही संशय पोलिसांना आहे. घटनेला आठवडा झाल्यानंतरही ही अर्भके कोणाची, कोठून आली? याभोवतीच तपासाची चक्रे फिरत आहेत. या सर्व घटनेचा तपास घेण्यासाठी सीसीटीव्ही फुटेज हाच एक महत्त्वाचा धागादोरा आहे. परंतु, उपलब्ध फुटेजमधून फारसे काही दिसून आलेले नाही. छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयाच्या आवारात गुरुवारी आढळून आलेल्या नवजात अर्भकांच्या प्रकरणाचे गांभीर्य एका बाजूला वाढत असताना दुसरीकडे शासकीय आणि प्रशासकीय पातळीवर अनास्थाच दिसून येत आहे. आठ दिवसानंंतरही या प्रकरणाच्या तपासात कोणतीच प्रगती झालेली दिसून येत नाही. सीपीआर प्रशासनाने पोलिसांकडे बोट दाखवून या प्रकरणातून आपले हात झटकले आहेत. आता पोलिसांच्या तपासाची भिस्त सीसीटीव्ही कॅमेर्‍यांच्या फुटेजवरच अवलंबून आहे. परंतु, अद्यापही त्यांना अपेक्षित फुटेज मिळालेले नाही. सीपीआरच्या सीसीटीव्ही कॅमेर्‍यातही अपेक्षित धागेदोरे हाती आलेले नाहीत. त्यामुळे या प्रकरणाचे गूढ वाढत चालले आहे.

सीपीआरमधील बहुतेक कॅमेरे बंदच

सीपीआर हॉस्पिटलच्या आवारात बसवलेल्या सीसीटीव्ही कॅमेर्‍यांपैकी बहुतांशी सीसीटीव्ही कॅमेरे बंदच आहेत. त्यामुळे तपासावर मर्यादा येत आहेत. उपलब्ध सीसीटीव्ही फुटेज मिळविण्यासाठी पोलिसांचे आणखीन प्रयत्न सुरू आहेत.

पोलिस छडा लावणारच

सीपीआरच्या वैद्यकीय समितीने ‘ती’ अर्भके सीपीआरमधील नाहीतच, असा निष्कर्ष काढला असला तरीदेखील पोलिस त्यांच्या पद्धतीने याचा तपास करत आहेत. वैद्यकीय समितीच्या अहवालात कुत्र्यांनी बाहेरून ही अर्भके ओढत आणल्याचा उल्लेख आहे. परंतु, बाहेरून म्हणजे कोठून? नवजात अर्भके अशी रस्त्यावर कशी पडतील. कुत्र्यांना ती कशी सापडतील? असे अनेक प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाले आहेत. कोणीतरी माणसाने टाकल्याशिवाय ती अर्भके येथे येणारच नाहीत. त्यामुळे पोलिसांनी या प्रकरणावरचा फोकस वाढविल्याचे तपास अधिकारी फाळके यांनी सांगितले.

Back to top button