१२ ते २० टक्के कमिशन घेत असल्याचा डी. के. शिवकुमार यांच्यावर आरोप | पुढारी

१२ ते २० टक्के कमिशन घेत असल्याचा डी. के. शिवकुमार यांच्यावर आरोप

बेंगलोर, पुढारी ऑनलाईन

कर्नाटकातील काँग्रेसचे बडे नेते आणि प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार यांच्यावर त्यांच्याच पक्षातील नेत्यांनी गंभीर आरोप लावले आहेत. शिवकुमार प्रत्येक कामातील १२ ते २० टक्के कमिशन घेतात. शिवाय ते मद्यपान करत असल्याने अडखळत बोलत असतात असा आरोप करणारा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

या व्हिडिओनंतर त्यातील दोन्ही नेत्यांवर कडक कारवाई केली आहे. सत्ताधारी भाजपने काँग्रेस पक्षावर निशाना साधला असून प्रदेश काँग्रेस कमिटीने पक्षाचे नेते व्ही. एस. उग्रप्पा यांना कारणे दाखवा नोटीस तर पक्षाचे नेते सलीम अहमद यांना सहा वर्षांसाठी पक्षातून निलंबित केले आहे.

एका पत्रकार परिषदेदरम्यान अनौपचारिक गप्पा मारत असताना मीडियाचे माईक सुरूच होते. त्यात या दोन नेत्यांचे बोलणे रेकॉर्ड झाले. हे दोघेही नेते अगदी हळू आवाजात बोलत होते.

काँग्रेसचे माजी खासदार व्ही. एस. उग्रप्पा आणि कर्नाटक काँग्रेसचे मीडिया समन्वयक सलीम अहमद अनौपचारिक बोलत होते. मीडिया समन्वयक सलीम म्हणतात उग्रप्पा यांना काहीतरी सांगत आहेत, त्यात ते म्हणतात, ‘शिवकुमार १०-१२ टक्के कमिशन घेतात. एवढंच कशाला त्यांच्या सहकाऱ्यांनीही शेकडो कोटींची संपत्ती गोळा केली आहे. शिवकुमार आधी ६ ते ८ टक्के कमिशन घेत होते. पण आता ते कमिशन वाढवले आहे. आता ते १०-२० टक्के केले आहे. हा एक मोठा घोटाळा आहे. जेवढं खोदाल तितके बाहेर येईल. शिवकुमार यांचा सहकारी मुलगुंडने ५० ते १०० कोटी रुपये कमावले आहेत.’

डी. के. शिवकुमार आरोप : मद्यपान केल्याने अडखळतात…

या व्हिडिओत सलीम शिवकुमार यांच्यावर आणखी एक गंभीर आरोप करत आहे. शिवकुमार मद्यपान करत असल्याने त्यांचा आवाज अडखळतो, असेही ते म्हणत आहेत. ‘शिवकुमार हे बोलताना बऱ्याचदा अडखळतात. पण, मला माहीत नाही की, हे कमी रक्तदाबामुळे होते की दारूमुळे. आम्ही लोकांनी अनेक वेळा चर्चाही केली आहे.’

या व्हिडिओमुळे कर्नाटकच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. डी. के. शिवकुमार हे कर्नाटक काँग्रेसमधील बडे प्रस्थ मानले जाते. ते राष्ट्रीय पातळीवरही महत्त्वाचे नेते आहेत. काँग्रेसचे संकटमोचक म्हणून त्यांची ओळख आहे.

महाराष्ट्रातही झाले होते बोलणे रेकॉर्ड

माणिकराव ठाकरे हे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष असताना त्यांचेही बोलणे असेच पत्रकार परिषदेत रेकॉर्ड झाले होते. रॅलीसाठी लागणारा खर्च गोळा करण्याबाबत ते बोलत होते. आर्थिक व्यवहाराची गुप्त चर्चा बाहेर पडल्याने ते अडचणीत आले होते.

हेही वाचा : 

Back to top button