पाण्याच्या बाटली ची किंमत दोन बेडरूमच्या फ्लॅटइतकी ! - पुढारी

पाण्याच्या बाटली ची किंमत दोन बेडरूमच्या फ्लॅटइतकी !

लंडन : अत्यंत महागडे परफ्यूम, शॅम्पेनच्या बाटल्यांविषयीचे वृत्त येत असते. मात्र, एखादी पाण्याची बाटली ही अशी महागडी असू शकते याची आपण कल्पना करणार नाही. मात्र, जगाच्या पाठीवर असेही घडते! एका पाण्याच्या बाटली ची किंमत अशी आहे की जिच्या किमतीत एखाद्या मोठ्या शहरात 2 बीएचके फ्लॅटही खरेदी करता येऊ शकेल!

या महागड्या पाण्याच्या बाटलीचे नाव आहे ‘अ‍ॅक्‍वा डी क्रिस्टॅलो ट्रायब्युटो ए मोडीग्लियानी’. या एका बाटलीची किंमत 60 हजार डॉलर्स म्हणजेच तब्बल 45 लाख रुपये आहे. तरीही या बाटलीत पूर्ण एक लिटरही पाणी नसते.

या बाटलीत केवळ 750 मिलीलीटर पाणीच असते. या पाण्याच्या बाटली मधील पाण्याची किंमत इतकी अव्वाच्या सव्वा असण्याचे कारण म्हणजे हे पाणी फ्रान्स आणि फिजीमधील एका नैसर्गिक झर्‍यातून आलेले अतिशय शुद्ध आणि स्वादिष्ट पाणी असते. या पाण्यामुळे सामान्य पाण्यापेक्षा अधिक ऊर्जा मिळते.

शिवाय हे पाणी ज्या बाटलीतून दिले जाते ती बाटलीही 24 कॅरेट सोन्यापासून बनवलेली असते. जगातील सर्वात प्रसिद्ध बॉटल डिझायनर फर्नांडो अल्तामिरानो यांनी या बाटलीचे डिझाईन केले आहे. जगातील सर्वात महागडी बाटली ‘कॉन्यॅक डुडोगन हेरिटेज हेनरी 4’ चेही त्यांनीच डिझाईन केले होते.

Back to top button