पुणे क्राईम : गाडीला कट मारल्याच्या कारणातून वाद; मारहाणीत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू - पुढारी

पुणे क्राईम : गाडीला कट मारल्याच्या कारणातून वाद; मारहाणीत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू

पुणे : पुढारी वृत्तसेवा

पुणे क्राईम : चारचाकी गाडीला दुचाकीचा कट लागल्याच्या कारणातून झालेल्या वादात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. अक्षय अंकुश टिळेकर (वय. 23,रा. दत्तवाडी उरुळी कांचन ) असे मृत्यू झालेल्या तरुणाचं नाव आहे. चार चाकी गाडीमध्ये असलेल्या तीन लोकांनी अक्षयला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली होती. घाव वर्मी लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.

ही घटना बुधवारी रात्री साडेआठच्या सुमारास येथील बागडे ते मळा भवरापूर रोड उरुळीकांचन परिसरात घडली आहे. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत लोणी काळभोर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

पुणे क्राईम : वादाचे रुपांतर भांडणात..

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अक्षय टिळेकर हा दुचाकीवरुन रस्त्याने निघाला होता. यावेळी त्याचा एका चार चाकी स्विफ्ट गाडीला धक्का लागला. त्यातूनच गाडीतील नागरिक व त्याची वादावादी झाली. वादाचे रूपांतर भांडणात झाले. त्यावेळी स्विफ्ट गाडीतील तीन ते चार जणांनी अक्षय याला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. मारहाणीत अक्षय बेशुद्ध पडला होता.

घटनेची माहिती मिळताच लोणी काळभोर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत, अक्षयला उपचारासाठी नजीकच्या रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

त्यानंतर अक्षय याचा मृतदेह ससून रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. आरोपींच्या मागावर पोलिसांची पथके रवाना झाली असून, पुढील तपास लोणी काळभोर पोलिस करत आहेत.

Back to top button