बार्शी मध्ये दरोडेखोरांनी ट्रॅक्टर- ट्रॉलीसह १५ लाखांचा मुद्देमाल लांबविला - पुढारी

बार्शी मध्ये दरोडेखोरांनी ट्रॅक्टर- ट्रॉलीसह १५ लाखांचा मुद्देमाल लांबविला

बार्शी ; पुढारी वृत्तसेवा : गावाकडे निघालेल्या ट्रॅक्टरचालक संजय राठोड (वय 20 वर्षे, रा. विचकुलदरा तांडा वडवणी, ता. वडवणी, जि. बीड) याला चार-पाच दरोडेखोरांनी मारहाण करीत हात-पाय बांधून लुटले. दरोडेखोरांनी ट्रॅक्टर-ट्रॉली, चालकाचा मोबाईल तसेच रोख रक्‍कम असा सुमारे 15 लाख रुपयांचा मुद्देमाल लांबविला. बार्शी-येरमाळा मार्गावरील पाथरी गावानजीक मंगळवारी रात्री ही घटना घडली. याप्रकरणी बार्शी तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.

राठोड मंगळवारी रात्री ट्रॅक्टरला दोन ट्रॉल्या जोडून टेंभुणी-कुडूवाडी-बार्शीमार्गे वडवणी गावी निघाला होता. त्याचा भाऊ दुचाकीवरून पुढे निघून गेला होता. रात्री साडेनऊच्या सुमारास पाथरी येथे रस्त्यात खड्डे असल्याने तो ट्रॅक्टर सावकाश चालवत होता.

दरम्यान, अचानक रस्त्याच्या कडेला बसलेले चार ते पाच दरोडेखोर धावत आले. ते ट्रॉल्यांमध्ये चढून बसले. त्यानांतर काही कळायच्या आत त्यांनी ट्रॅक्टर बंद करून संजयला ट्रॅक्टरच्या खाली ओढले. त्यानंतर त्यातील एकजण ट्रॅक्टर चालू करून पुढे येरमाळ्याचे दिशेने निघून गेला. अन्य चारजणांनी संजयला रस्त्याच्या कडेला अंधारात नेऊन लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली.

त्यांनी संजयकडील पैसे काढून घेऊन पुन्हा काही अंतरावर ऊसाच्या शेतात नेऊन त्याची पँट काढून पॅटने पाय बांधले. त्याचा शर्ट काढून त्याचे दोन्ही हात बांधले व बनियन काढून त्याचे तोंड बांधले. दरोडेखोरांनी त्याच्या खिशातील रोख पाच हजार रुपये व मोबाईल काढून घेऊन त्याला तेथेच टाकून पळ काढला.

संजयने कशीबशी सुटका करून घेऊन घरच्यांना कळविले. त्यानुसार बुधवारी याबाबत बार्शी तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

Back to top button