नवी दिल्ली ; वृत्तसंस्था : सणासुदीच्या काळात खाद्यतेल स्वस्त व्हावे म्हणून पाम, सोयाबीन, सूर्यफुलाच्या कच्च्या तेलावरील कृषी करात मार्च 22 पर्यंत कपात करण्याचा निर्णय केंद्र सरकारने बुधवारी घेतला.
केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क विभागाच्या (सीबीआयसी) अधिसूचनेनुसार कच्च्या पाम तेलावर आता 7.5% कृषी विकास उपकर आकारला जाईल.
कच्च्या सोयाबीन तेलावर, कच्च्या सूर्यफूल तेलावर हा कर 5% असेल. शुल्कातील ही कपात 14 ऑक्टोबरपासून आणि ती 31 मार्च 2022 पर्यंत लागू असेल. पाम, सोयाबीन आणि सूर्यफूल तेलाच्या कच्च्या प्रकारांवर सीमा शुल्क अनुक्रमे 8.25, 5.5 आणि 5.5% असेल.
केंद्र शासनाने नैसर्गिक वायूच्या दरात 62% वाढ केल्यानंतर मुंबईत सीएनजी आणि पीएनजी दरात सातत्याने भडका उडू लागला आहे. महानगर गॅस लिमिटेड (एमजीएल)ने बुधवारी सीएनजीच्या दरात 2.30 रुपये प्रति किलोने वाढ करताना घरगुती वापराच्या पीएनजी दरातही 1.11 रुपये प्रति एससीएमपर्यंत वाढ केली. ही दरवाढ 14 ऑक्टोबरच्या पहाटेपासून लागू होईल.
10 दिवसांत दुसर्यांदा दरवाढ झाल्याने टॅक्सी व रिक्षा चालकांसह गृहिणींचे बजेट कोलमडणार आहे. याआधी एमजीएलने सीएनजी आणि पीएनजीच्या दरात 4 ऑक्टोबरला किलोमागे 2 रुपयांची वाढ केली होती.