Murder : संपत्तीसाठी वाद झाला, मोठ्या भावाने सख्ख्या भावाचा काटाच काढला | पुढारी

Murder : संपत्तीसाठी वाद झाला, मोठ्या भावाने सख्ख्या भावाचा काटाच काढला

मुरूड (लातूर), पुढारी वृत्तसेवा : वडिलोपार्जित संपूर्ण संपत्ती आपणाला मिळावी यासाठी संपत्तीत वाटेकरी ठरणाऱ्या लहान भावास डोक्यात काठीने मारून खून (Murder) करून त्याचे प्रेत मांजरा नदी पात्रात फेकून दिल्याची घटना तांदुळजा (ता. लातूर) शिवारात दि ६ ऑक्टोबर रोजी घडली. गुन्हा उघडकीस आणण्यासाठी पोलिसांना तांत्रिक माहितीसह  मृतदेह शोधण्यासाठी आपत्ती व्यवस्थापनाच्या बोटीचा आधार घ्यावा लागला.

याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, तांदुळजा (ता. लातूर) येथे हरिभाऊ उद्धव गायकवाड हे आपली दोन मुले विपीन गायकवाड आणि दगडू उर्फ विशाल गायकवाड यांच्यासह राहतात. संपूर्ण परिवार शेतीव्यवसाय करतो. हरिभाऊ गायकवाड व त्यांचा मुलगा विशाल गायकवाड हे शेतात काम करतात तर मोठा मुलगा विपीन गायकवाड हा घरचा कारभारी म्हणून घरातील आर्थिक व्यवहार पाहत असे.

अनेक वेळेस विपीन गायकवाड याने शेतातील उत्पादनाचे आलेले पैसे परस्पर खर्च केले होते. याबाबत त्याचा लहान भाऊ दगडू उर्फ विशाल गायकवाड याने मोठ्या भावास जाब विचारला होता. लहान भाऊ आपणास जाब विचारत आहे याचा अर्थ वडिलांच्या संपूर्ण प्रॉपर्टीचा आता आपणास मनासारखा उपभोग घेता येणार नाही हे विपिन गायकवाडच्या लक्षात आले.

यामुळे संपूर्ण संपत्ती आपणास एकटाच मिळावी यासाठी लहान भाऊ दगडू उर्फ विशाल गायकवाड याचा खून (Murder) करण्याचा योजना आखली. दि ६ ऑक्टोबर रोजी विशाल गायकवाड हा शेतात झोपण्यासाठी गेला असता विपीणने आपला मित्र रांजणी (ता.कळंब) येथील रहिवासी विकास ढाणे यांस सोबत घेऊन  शेतात गेला.

त्याठिकाणी रात्री उशिरा विपीन आणि विकास याने झोपेत असलेल्या विशालच्या डोक्यात लोखंडी रॉड आणि काठीने जबर मारहाण करून विशालचा खून केला. त्याचा मृतदेह स्वतःच्या मारुती अल्टो गाडीत घालून विपीन आणि विकास ढाणे यांनी सारसामार्गे तट बोरगाव (ता. अंबाजोगाई) येथे गेले. त्याठिकाणी त्यांनी मांजरा नदीच्या पुलावरून तुडुंब भरून वाहत असलेल्या नदीत मृतदेह टाकून दिला व काहीच घडले नाही अशाप्रकारे दाखवत घरी घरी येऊन झोपले.

शेतात गेलेला मुलगा शेतात नाही मात्र त्याची मोटारसायकल व चप्पल शेतात होती. वडिलांनी विचारणा केल्यावर विपीनने विशाल असेल कुठेतरी रुसून गेला असेल असे म्हणून उडवाउडवीची उत्तरे दिली. दोन दिवस शोध घेतल्यानंतरही विशाल घरी न आल्यामुळे हरिभाऊ गायकवाड यांनी पोलीस ठाणे गाठले व पोलिसांना दोन दिवसांपासून विशाल गायब असून दोन्ही भावाचा संपत्तीवरून वाद झाल्याचे सांगितले.

हरिभाऊ गायकवाड यांच्या फिर्यादीवरून सपोनि धनंजय ढोणे तसेच सहायक फौजदार चौगुले व त्यांच्या सहकाऱ्यांनी तांत्रिक गोष्टीच्या आधारे आणि परिसरात फिरून माहिती घेतली. गुप्त माहितीवरून विशालचा भाऊ विपीन यास चौकशीसाठी ताब्यात घेतले. पोलिसी हिसका दाखवताच विपीनने आपणच आपला मित्र विकास ढाणे याच्या मदतीने विशालचा खून केला असून त्याचा मृतदेह तट बोरगाव येथे मांजरा नदी टाकल्याचे सांगितले.

विपीन आणि विकास यांनी गुन्हा कबुल केला असला तरी नदीत टाकलेला मृतदेह मिळवणे हे पोलिसांसमोर खूप मोठे आव्हान होते. मांजरा नदी दुथडी भरून वाहत होती. पोलिसांनी मृतदेह शोधण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातून आपत्ती व्यवस्थापनच्या कर्मचाऱ्यांचे सहकार्य घेतले. १२ ऑक्टोबर रोजी सपोनि धनंजय ढोणे आणि स्वतः कर्मचाऱ्यांसह बोटीत बसून दिवसभर  नदीपात्रात मृतदेहाचा शोध घेत होते. रात्री सातच्या  सुमारास पोलिसांना कोपरा (ता. अंबाजोगाई) शिवारात  झाडास अडकलेला मृतदेह दिसला.

नागपूर क्राईम : कुख्यात गुंडाचेच अपहरण करून हत्या; दोघांना अटक

पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन आज १३ ऑक्टोबर रोजी पोस्टमार्टम केले. अगोदर दाखल झालेल्या अपहरणाच्या गुन्ह्यात (Murder) वाढ करून आरोपी नितीन गायकवाड व विकास ढाणे यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्याची कारवाई रात्री उशिरापर्यंत सुरू होती. अपहरणाच्या गुन्ह्याचा तांत्रिक गोष्टीच्या व गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी तपास करून आरोपींना बेड्या घालण्यात तसेच मृतदेह ताब्यात घेण्यात घेण्यासाठी केलेल्या प्रयत्नाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.

Back to top button