गांधींनी सावरकरांना इंग्रजांची माफी मागण्याचा सल्ला दिला होता का? राजनाथ सिंहांच्या दाव्यात किती तथ्य? - पुढारी

गांधींनी सावरकरांना इंग्रजांची माफी मागण्याचा सल्ला दिला होता का? राजनाथ सिंहांच्या दाव्यात किती तथ्य?

पुढारी ऑनलाईन : अर्जुन नलवडे

महात्मा गांधीजींनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांना इंग्रजांची माफी मागण्याचा सल्ला दिला होता का? हा प्रश्न आज चर्चेत आला आहे. याच कारण म्हणजे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी अशा प्रकारचे विधान केले आहे आणि त्यावर राजकीय चर्चा, टीकाटिप्पणी सुरू झाल्या आहेत.

राजनाथ सिंह यांनी एका कार्यक्रमात स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी महात्मा गांधी यांच्या सांगण्यावरून माफी मागितली असा दावा केला. या विषयाचे ऐतिहासिक संदर्भ काय आहेत, हे जाणून घेण्याचा प्रयत्न पुढारी ऑनलाईनने केला.

राजनाथ सिंह सावकर आणि गांधी यांच्याबद्दल काय म्हणाले?

“इंग्रजांची विनायक दामोदर सावरकर यांनी जी माफी मागितली, त्या घटनेला समाजातील एका विशिष्ट वर्गाने चुकीच्या पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न केला आहे. सावरकर जेव्हा तुरुंगात शिक्षा भोगत होते तेव्हा इंग्रजांची माफी मागितली, ते महात्मा गांधींच्या सांगण्यावरून माफी मागितली होती”, असे ते म्हणाले.

दिल्लीमध्ये उदय माहूरकर आणि चिरायु पंडित लिखित ‘वीर सावरकर हू कुड हॅव प्रिवेंटेड पार्टिशन’ या पुस्तकाच्या प्रकाशन कार्यक्रमात राजनाथ सिंह यांनी हा दावा केला. यावेळी सरसंघसंचालक मोहन भागवत हेदेखील उपस्थित होते.

ऐतिहासिक संदर्भ काय आहेत?

तुषार गांधी
तुषार गांधी

महात्मा गांधीजींचे पणतू तुषार गांधी यांच्याशी दैनिक पुढारीने याविषयावर चर्चा केली. तुषार गांधी यांच्या मते राजनाथ सिंह यांच्या दाव्यात तथ्य नाही.

“सन १९११ पासून सावरकरांनी इग्रजांना माफीनामे पाठविण्याची आणि तुरुंगातून सुटका करण्याची विनंती करण्यास सुरुवात केली. तेव्हा महात्मा गांधी दक्षिण आफ्रिकेत होते आणि ते सत्याग्रह करत होते. तेव्हा गांधींना भारतात घडणाऱ्या घटनांमध्ये काही रस नव्हता. इतकंच नाही तर त्यात हस्तक्षेप करण्यासाठी वेळदेखील नव्हता. त्यामुळे त्या काळी सावरकरांशी गांधींचा कोणताही संबंध नव्हता. त्यामुळे गांधींच्या सांगण्यावरून सावकरांनी इंग्रजांना माफीनामे दिले, या दाव्यात काही अर्थ नाही,” असं स्पष्टीकरण तुषार गांधी यांनी दिलं.

तुषार गांधी पुढे सांगतात की, “१९२५ मध्ये एक पत्र गांधींनी लिहिलं होते, त्यात त्यांनी सावकरांच्या सुटकेचं समर्थन केलं होतं. हेच पत्र प्रथम आहे, ज्यात गांधींचा सावरकरांच्या बाबतीतील मत दिसून आलं.”

कस्तुरबांचं आजारपण आणि गांधीचं ‘ते’ पत्र

दक्षिण आफ्रिकेत गांधी जेव्हा तुरुंगात होते, तेव्हा कस्तुरबा या खूप आजारी होत्या. तेव्हा गांधींचे सहकारी अल्बर्ट वेस्ट यांना असं वाटत होतं की, कस्तुरबा आता जास्त काळ राहणार नाही. त्यामुळेअल्बर्ट वेस्ट यांनी गांधींना तुरुंगात पत्र लिहून इंग्रजांची माफी मागावी आणि तुरुंगातून सोडून देण्याची विनंती करावी, असं सुचवलं होतं.

त्यावर गांधीजींनी कस्तुरबांना एक पत्र लिहून इंग्रजांची माफी मागणं शक्य होणार नाही, असं स्पष्ट केलं होतं.

या पत्रात ते म्हणतात की, “तुझ्या आजाराची बातमी मला मिळाली. तू कदाचित तू जास्त काळ जगणार नाहीस, हे जाणून मला जास्त दुःख होत आहे. पण, मी एका मोहिमेवर आहे. ज्या मुद्द्यांसाठी मी लढा देत आहे अशात मी सरकारची माफी मागितली आणि तुरुंगातून सुटका करून घेतली तर त्या लढ्याशी मी गद्दारी केल्यासारखे होईल. त्यामुळे ते माझ्यासाठी शक्य नाही. माझा जो लढा आहे तो सत्याचा लढा आहे, त्याच्याशी माझी गद्दारी करू शकत नाही. त्यामुळे तुझ्यासाठी मी माफी मागून तुझ्याजवळ येणं शक्य नाही. तू मला माफ करशील.’

या पत्राचा संदर्भ देत तुषार गांधी म्हणाले, “ज्या माणसामध्ये आपल्या लढ्याबाबतीत एवढी तळमळ आणि कट्टरता होती तो माणूस स्वतःही माफी मागणार नाही आणि इतरानांही माफी मागा असं सुचवणार नाही.”

“राजनाथ यांचं गांधी आणि सावरकांवरील वक्तव्य एक कट”

तुषार गांधी म्हणाले की, “राजनाथ यांचे वक्तव्य हस्यास्पद तर आहेच, पण तो एक कटही आहे. महात्मा गांधीच्या हत्येनंतर आरएसएसला बरोबर ठरविण्यासाठी जे काही कट करण्यात आले, त्याच कटाचा हा एक भाग आहे. खोटा इतिहास सांगून गांधींना भ्रष्ट ठरवायचं चाललं आहे.”

“सत्याला असत्य ठरवायचं आणि असत्य इतिहास लोकांना सांगून त्याला मान्यता मिळवायची. त्यामुळेच त्यांच्या या विधानाचा विरोध व्हायला पाहिजे. त्यामुळे जे सत्य ते तितक्याच स्पष्टपणे सांगण्याची गरज आहे.”

कुमार सप्तर्षी काय म्हणतात?

कुमार सप्तर्षी
कुमार सप्तर्षी

गांधीवादी विचारवंत कुमार सप्तर्षी यांनी या विषयावर राजनाथ सिंह आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीका केली. ते म्हणाले,  “राजनाथ सिंह हे तद्दन खोटं बोलत आहेत. परंतु, मला त्यांचं आश्चर्य वाटत नाही. गांधींना लहान करण्यासाठी सावरकरांना मोठं केलं पाहिजे, या विचारातूनच राजनाथ सिंह यांनी हे वक्तव्य केलं आहे. इतिहास आपल्या सोईनुसार रचणे, हाच फॅसिझमचा सर्वात मोठा आधार असतो.”

राजनाथ सिंह गांधी आणि सावरकर यांच्याबद्दलचं सविस्तर भाषण असं!

राजनाथ सिंह
राजनाथ सिंह

राजनाथ सिंह म्हणाले की, “सावरकर यांच्याविरोधात चुकीचे समज पसरविण्यात आलेले आहेत. असं  सांगण्यात आलं की, ते वारंवार इंग्रजांना माफीनामा देत राहिले. खरं तर हा माफीनामा सावरकरांना स्वतःच्या मर्जीने दिलेला नव्हता. त्यांना महात्मा गांधी सांगितले होते की, माफीनामा सादर करा. त्यामुळे महात्मा गांधींच्या सांगण्यावरून सावरकरांनी माफीनामा दिलेला होता.”

“महात्मा गांधींनी अपील केलं होतं की, सावरकर यांची सुटका करण्यात यावी. जसे आम्ही स्वातंत्र्यासाठी आंदोलन करत आहोत, तसेच सावरकरही स्वातंत्र आंदोलन चालवतील, असं गांधीजी म्हणाले होते. सावरकारंनी माफीनामा दिला आणि आपल्या सुटकेची याचना केली, असं म्हणणं पूर्णपणे तथ्यहीन आहे.”

“सावकरांवर आरोप करणारे लेनिनवादी, मार्क्सवादी विचाराने प्रेरित आहेत वीर सावरकर महानायक होते, आहेत आणि भविष्यात राहतील. देशाला स्वातंत्र्य मिळविण्याची त्यांची इच्छा इतकी तीव्र होती की, इंग्रजांनी त्यांना दोन वेळा जन्मठेप सुनावण्यात आली. पण, काही लोक विशेष विचारधारेने प्रभावित होऊन त्यांच्या राष्ट्रवादावर प्रश्न निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. काही लोक सावरकर हे नाझीवादी, फॅसिस्टवादी असल्याचा आरोप करतात,” असंही स्पष्टीकरण राजनाथ सिंह यांनी दिले.

राजनाथ सिंह यांच्या कार्यक्रमात मोहन भागवत काय म्हणाले?

मोहन भागवत
मोहन भागवत

यावेळी सरसंघसंचालक मोहन भागवत म्हणाले की, “स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सावकरांना बदनाम करण्यासाठी एक मोहीम चाललिण्यात आली. त्यानंतर स्वामी विवेकानंद, स्वामी दयानंद सरस्वती आणि योगी अरविंद यांना बदनाम करण्याची मोहीम सुरू केली जाईल. कारण, सावरकर हे या तिघांच्या विचारांनी प्रभावित झालेल होते. सावरकरांचं हिंदुत्व, विवेकानंदाचे हिंदुत्व, असं बोलण्याची एक फॅशन झाली आहे. हिंदुत्व एकच आहे, ते पहिल्यापासून आहे आणि शेवटपर्यंत राहील.”

Back to top button