Lakhimpur Kheri violence case : आशिष मिश्राच्या अंतरिम जामिनाला ११ जुलैपर्यंत मुदतवाढ | पुढारी

Lakhimpur Kheri violence case : आशिष मिश्राच्या अंतरिम जामिनाला ११ जुलैपर्यंत मुदतवाढ

पुढारी ऑनलाईन डेस्क : लखीमपूर खेरी हिंसाचार प्रकरणात (Lakhimpur Kheri violence case) केंद्रीय मंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष मिश्रा याच्या अंतरिम जामिनाची मुदत ११ जुलैपर्यंत वाढविण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाने जानेवारीमध्ये आशिष मिश्रा यांना ८ आठवड्यांसाठी अंतरिम जामीन मंजूर केला होता.

यासंदर्भात दैनंदिन सुनावणी घेऊन प्रकरण निकाली काढावे, अशी विनंती पीडितांकडून अॅड. प्रशांत भूषण यांनी केली. मात्र न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जे. के. माहेश्वरी यांच्या खंडपीठाने दैनंदिन सुनावणी घेणे शक्य नसल्याचे स्पष्ट केले.

सर्वोच्च न्यायालयाने याआधी 25 जानेवारी रोजी झालेल्या सुनावणीवेळी आशिष मिश्रा याला विविध अटी घालून अंतरिम जामीन दिला होता. जामीन प्राप्त असतानाच्या काळात आठ आठवडे उत्तर प्रदेश किंवा दिल्लीमध्ये राहू नये, अशी मुख्य अट न्यायालयाने आशिषला घातली होती. आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांच्या अंगावर गाडी घालून त्यांच्या मृत्यूस कारणीभूत असल्याचा आरोप झालेला आशिष मिश्रा हा केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा टेणी यांचा मुलगा आहे.

३ ऑक्टोबर २०२१ रोजी उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी जिल्ह्यातील टिकुनिया येथे शेतकऱ्यांच्या आंदोलनाला (Lakhimpur Kheri violence case)  हिंसक वळण लागले होते. यात ४ शेतकऱ्यांसह ८ जणांना आपला जीव गमवावा लागला होता. उत्तर प्रदेशचे तत्कालीन उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांच्या दौऱ्याचा निषेध करणासाठी शेतकरी जमले होते. यावेळी आशिष मिश्रा याच्या भरधाव गाडीखाली   ८ जण चिरडले होते. त्यानंतर शेतकरी संतप्त झाले होते.

Lakhimpur Kheri violence case  आशिष मिश्रा यांना अटींवर जामीन मंजूर

सुप्रीम कोर्टाने आशिष मिश्रा याला जामिना देताना दिल्ली किंवा उत्तर प्रदेशात राहणार नाही, या अटीवर जामीन मंजूर केला होता. जामिनावर सुटल्यानंतर न्यायालयाने त्याला एका आठवड्यानंतर उत्तर प्रदेश सोडण्यास सांगितले होते. त्याचबरोबर आशिष किंवा त्याच्या कुटुंबीयांनी साक्षीदारांवर प्रभाव टाकण्याचा आणि खटल्याला उशीर करण्याचा प्रयत्न केल्यास त्याचा जामीन रद्द होऊ शकतो, असेही खंडपीठाने स्पष्ट केले आहे.

हेही वाचा 

Back to top button