लखीमपूर हत्याकांड : ‘एसआयटी’च्या दोषारोपपत्रात आशिष मिश्रा मुख्य आरोपी | पुढारी

लखीमपूर हत्याकांड : 'एसआयटी'च्या दोषारोपपत्रात आशिष मिश्रा मुख्य आरोपी

पुढारी ऑनलाईन डेस्क : लखीमपूर हत्याकांड प्रकरणात आज मुख्य आरोपी आशीष मिश्रासहीत १३ जणांविरोधात ‘एसआयटी’ने न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले आहे. हिंसाचाराच्या घटनेनंतर ८८ दिवसांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केलेले असून, त्यामध्ये आशिष मिश्रा उर्फ मोनूला मुख्य आरोपी सांंगण्यात आलेला आहे. ‘एसआयटी’चे हे दोषारोपपत्र तब्बल ५ हजार पानांचे आहे. त्यामध्ये प्रत्यक्ष घटनास्थळी आशिष मिश्रा हजर होता, असेही स्‍पष्‍ट करण्‍यात आले आहे.

मागील काही दिवसांपूर्वी एसआयटीने लखीमपूर हिंसाचार प्रकरणातील कलम हटवून त्या जागी हत्येचा प्रयत्न, मारहाण करणे, एकत्रित गुन्हा या विषयांसदर्भात कलम वाढविण्यात आली. विशेष हे की, एसआयटीने आपल्या दोषारोपपत्रात सांगितले आहे की, “हा गुन्हा निष्काळजीपणाने झालेला नसून तो जाणीवपूर्वक करण्यात आलेला प्रयत्न होता. तसेच हत्या करण्याच्या उद्देशानेच हा गुन्हा करण्यात आला आहे.

या खुलाशानंतर सर्व आरोपींवर हत्या केल्याचा खटला दाखल करण्यात आला आहे. ‘एसआयटी’ने सर्व आरोपींवर ३०७, ३२६, ३०२, ३४, १२० बी, १४७, १४८, १४९ या कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. यापूर्वी लखीमपूर हत्याकांड प्रकरणात आशीष मिश्रासहीत सर्व आरोपींवर २७८, ३३८, ३०४ कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

लखीमपूर हत्याकांड प्रकरण

३ ऑक्टोबर रोजी लखीमपूर खेरी येथे शेतकरी आंदोलनादरम्यान झालेल्या या घटनेत चार शेतकऱ्यांसह आठ जणांचा मृत्यू झाला होता. आशिष मिश्रा यांनी चालविलेल्या एसयूव्हीने शेतकर्‍यांच्या अंगावर घातल्याने चार शेतकर्‍यांचा मृत्यू झाला. यानंतर हिंसाचार भडकला आणि आणखी चार जणांना, तसेच एका पत्रकाराला आपला जीव गमवावा लागला.

शेतकऱ्यांनी दाखल केलेल्या एफआयआरमध्ये आशिष मिश्रा यांचे नाव होते. ज्यामध्ये असे म्हटले आहे की, शेतकऱ्यांच्या शांततापूर्ण मोर्चादरम्यान आशिष आपल्या कारमधून वेगाने लोकांना चिरडत गेला. या घटनेत आणि त्यानंतर उसळलेल्या हिंसाचारात चार शेतकरी आणि ताफ्यातील चार लोकांसह आठ जणांचा मृत्यू झाला.

हेही वाचलं का? 

 

Back to top button