COVID-19 cases | कोरोनाने धास्ती वाढवली! देशात २४ तासांत ११,१०९ नवे रुग्ण, सक्रिय रुग्णसंख्या ५० हजारांजवळ | पुढारी

COVID-19 cases | कोरोनाने धास्ती वाढवली! देशात २४ तासांत ११,१०९ नवे रुग्ण, सक्रिय रुग्णसंख्या ५० हजारांजवळ

पुढारी ऑनलाईन : देशातील वाढत्या रुग्णसंख्येने चिंता वाढली आहे. गेल्या २४ तासांत कोरोनाचे ११,१०९ नवे रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे देशातील सक्रिय रुग्णसंख्या ४९,६२२ वर पोहोचली आहे. कोरोनाचा रिकव्हरी रेट ९८.७१ टक्क्यांवर आहे. तर मृत्यू दर १.१९ टक्के एवढा असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

रुग्णसंख्या वाढली तरी हॉस्पिटलायझेशन कमी

याआधीच्या दिवशी कोरोनाच्या १०,१५८ रुग्णांची नोंद झाली होती. कोविड -१९ भारतात (एंडेमिक स्टेज) स्थानिक पातळीच्या दिशेने वाटचाल करत आहे. कोविड-१९ ची प्रकरणे वाढत असली तरी हॉस्पिटलायझेशन कमी आहे आणि ते कमी राहण्याची शक्यता आहे, असे आरोग्य क्षेत्रातील अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे की पुढील १०-१२ दिवस रुग्णसंख्या वाढत राहतील आणि त्यानंतर ती कमी होईल. (COVID-19 cases)

महाराष्ट्रात दैनंदिन रुग्णसंख्या १ हजारावर

महाराष्ट्रात गुरुवारी १,०८६ नवीन रुग्णांची नोंद झाली. तर एकाचा मृत्यू झाला. राज्यात सलग दुसऱ्या दिवशी कोरोना रुग्णसंख्या १ हजारच्या वर राहिली आहे. बुधवारी राज्यात १,११५ रुग्णांची नोंद झाली होती, अशी माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.

उत्तर प्रदेशातही रुग्णसंख्येत वाढ

उत्तर प्रदेशातही कोरोना रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. येथे ५७५ नवे रुग्ण आढळून आले आहेत. या वर्षातील एका दिवसातील ही सर्वाधिक रुग्णसंख्या आहे, असे आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. हरदोई जिल्ह्यात एका कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाचा मृत्यू झाला. राज्यात कोविडच्या सक्रिय संख्येने २ हजारचा टप्पा ओलांडला आहे.

संपूर्ण आशियात कोरोनाची नवीन लाट

अनेक आशियाई देशात कोरोना संसर्गामध्ये वाढ झाली आहे. कोरोनाच्या नवीन लाटेमुळे आरोग्य सेवा प्रणालींवर ताण येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मार्चच्या शेवटच्या आठवड्यात सिंगापूरमध्ये कोरोना रुग्णसंख्या जवळपास दुप्पट होऊन या वर्षीच्या उच्च पातळीवर पोहोचली, असे आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीवरून दिसून आले आहे. इंडोनेशियातही दैनंदिन रुग्णसंख्या चार महिन्यांच्या उच्चांकावर जवळ पोहोचली आहे. व्हिएतनामने कोरोना प्रतिबंधात्मक उपाय हाती घेतले आहेत. सिंगापूरमध्ये मार्चच्या अखेरीस आठवड्याची रुग्णसंख्या १४ हजारांवरून २८ हजारांवर पोहोचली. गेल्या काही महिन्यांत इंडोनेशियातही कोरोना रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. येथे गेल्या बुधवारी दैनंदिन रुग्णसंख्या ९८७ वर पोहोचली.

हे ही वाचा :

Back to top button