आगामी 10 ते 12 दिवसांत देशातून कोरोनाचा काढता पाय? | पुढारी

आगामी 10 ते 12 दिवसांत देशातून कोरोनाचा काढता पाय?

कोल्हापूर; राजेंद्र जोशी :  देशातील कोरोना संसर्गाचा आलेख वाढतो असून तो आणखी 10 ते 12 दिवस अशाच पद्धतीने पुढे जाणार आहे. मात्र, त्यानंतर भारतातील कोरोनाची ही लाट उतरण्यास सुरुवात होईल, असे या क्षेत्रातील तज्ज्ञांचे अनुमान आहे.

केंद्र सरकारच्या आरोग्य मंत्रालयातील काही उच्चपदस्थांनीही एप्रिलअखेरीस कोरोनाची नवी लाट ओसरणीला लागण्याचे संकेत दिले आहेत. यामुळे येणार्‍या दोन आठवड्यांच्या कालावधीसाठी नागरिकांना सतर्क राहावे लागणार आहे. देशात सध्या कोरोनाचा एक्सबीबी.1.16 हे विषाणू रूप चिंतेचा विषय आहे. या संसर्गाने मार्चपासून आपले अस्तित्व दाखविण्यास सुरुवात केली. बुधवारी देशात 7 हजार 830 नवे बाधित रुग्ण आढळून येण्याचा उच्चांक झाला. मंगळवारी 5 हजार 675 रुग्ण आढळून आले होते. कोरोनाच्या या वाढत्या आलेखाने देशामध्ये कोरोना संसर्गबाधित उपचारार्थी रुग्णांची संख्या 40 हजार 215 वर पोहोचताना दैनंदिन बाधित रुग्णांचा दर (पॉझिटिव्हिटी रेट) 3.65 टक्क्यांवर, तर आठवड्याचा हा दर 3.83 टक्क्यांवर गेला आहे. हा आलेख वाढत असल्याने केंद्र सरकारने खबरदारीचे उपाय म्हणून राज्यांना लसीचे डोस खरेदी करून ग्रामीण कानाकोपर्‍यापर्यंत उपलब्ध करण्याचे आदेश दिले आहेत.

घाबरण्याचे कारण नाही

देशामध्ये कोरोनाचे एक्सबीबी.1.16 हे प्रतिरूप रुग्णसंख्येत मोठी भर टाकण्यास कारणीभूत ठरत असले, तरी या संसर्गाने बाधित झालेल्या रुग्णांमध्ये रुग्णालयात दाखल होण्याची आवश्यकता असलेले रुग्ण अत्यल्प आहेत. रुग्ण गंभीर होण्याचे प्रमाणही कमी आहे. यामुळे नागरिकांनी घाबरून जाण्याचे कोणतेही कारण नाही.

सिरमने एक वर्षानंतर सुरू केले कोव्हिशिल्डचे उत्पादन

कोरोनाच्या या दुसर्‍या अंकाला झालेला प्रारंभ आणि संसर्गाचा वाढता आलेख लक्षात घेऊन लसनिर्मिती क्षेेत्रात आघाडीवर असलेल्या पुण्याच्या ‘सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया’ने तब्बल एक वर्षानंतर पुन्हा कोव्हिशिल्डचे उत्पादन सुरू केले आहे.

Back to top button