Covid-19 | कोरोना रुग्णसंख्येत मोठी वाढ! देशात २४ तासांत १०,१५८ नवे रुग्ण | पुढारी

Covid-19 | कोरोना रुग्णसंख्येत मोठी वाढ! देशात २४ तासांत १०,१५८ नवे रुग्ण

पुढारी ऑनलाईन : देशात कोरोनाच्या दैनंदिन रुग्णसंख्येत मोठी वाढ झाली आहे. गेल्या २४ तासांत कोरोनाचे १०,१५८ नवे रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे सक्रिय रुग्णसंख्या ४४,९९८ वर पोहोचली असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

कोविड -१९ भारतात (एंडेमिक स्टेज) स्थानिक पातळीच्या दिशेने वाटचाल करत असल्याचे आरोग्य क्षेत्रातील अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. याआधीच्या दिवशी ७,८३० रुग्णांची नोंद झाली होती. ही रुग्णसंख्या सात महिन्यांतील सर्वाधिक आहे. आरोग्य अधिकार्‍यांच्या म्हणण्यानुसार, कोविड-१९ ची प्रकरणे वाढत असली तरी हॉस्पिटलायझेशन कमी आहे आणि ते कमी राहण्याची शक्यता आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे की पुढील १०-१२ दिवस रुग्णसंख्या वाढत राहतील आणि त्यानंतर ती कमी होईल. कोरोना विषाणू एंडेमिक बनला आहे. यामुळे तो मोठ्या प्रमाणात व्हेरिएंट निर्माण करतो.

मास्क अनिवार्य, एम्सकडून ॲडव्हाजरी जारी

दिल्लीतील ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (AIIMS) मधील काही कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. या पार्श्वभूमीवर AIIMS ने त्यांच्या कर्मचार्‍यांसाठी खबरदारीचा उपाय ॲडव्हाजरी जारी केली आहे. कोरोना रुग्णसंख्येतील वाढ लक्षात घेता आणि याचा नव्याने प्रादुर्भाव रोखण्यासाठी दिल्लीतील एम्सने सर्व रुग्णालयातील कर्मचाऱ्यांसाठी मास्क घालणे अनिवार्य केले आहे. कामाच्या ठिकाणी कापडाचे फेस कव्हर अथवा सर्जिकल मास्क वापरणे आवश्यक आहे. कामाच्या ठिकाणी स्वच्छता ठेवण्याच्याही सूचना देण्यात आल्या आहेत.

दिल्लीत चिंता वाढली

दिल्लीत बुधवारी कोरोना रुग्णसंख्येने १ हजारचा टप्पा ओलांडला. ही सात महिन्यांतील सर्वांधिक रुग्णसंख्या आहे. तर पॉझिटिव्हीटी रेट २३.८ टक्के इतका होता. बुधवारी देशाच्या राजधानीत १,१४९ रुग्णांची नोंद झाली होती. तर एका रुग्णांचा मृत्यू झाला होता, अशी माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.

हे ही वाचा :

Back to top button