शेतकरी मुलाशी लग्न केल्यास मुलीला २ लाखांचे बक्षीस; कुमारस्वामी यांची घोषणा | पुढारी

शेतकरी मुलाशी लग्न केल्यास मुलीला २ लाखांचे बक्षीस; कुमारस्वामी यांची घोषणा

पुढारी ऑनलाईन डेस्क : कर्नाटक निवडणुकीपूर्वी माजी मुख्यमंत्री आणि जनता दल (धर्मनिरपेक्ष) नेते एचडी कुमारस्वामी यांनी मोठी घोषणा केली आहे. त्यांचा पक्ष सत्तेवर आल्यास शेतकऱ्यांच्या मुलांशी लग्न करणाऱ्या मुलींना 2 लाख रुपयांचे बक्षीस देण्यात येईल. कोलार येथील ‘पंचरत्न’ रॅलीला संबोधित करताना कुमारस्वामी यांनी ही घोषणा केली आहे. कर्नाटक विधानसभेसाठी १० मेरोजी निवडणूक होणार आहे. तत्पूर्वी कुमारस्वामी यांनी प्रचारयंत्रणा गतीमान केली आहे.

यावेळी ते म्हणाले की, शेतकऱ्यांच्या मुलांशी लग्न करण्यासाठी प्रोत्साहन मिळण्यासाठी मुलींना २ लाखांचे बक्षीस देण्याची योजना आणली जाईल. मुली शेतकऱ्यांच्या मुलांशी लग्न करण्यास तयार नाहीत. शेतकऱ्यांच्या मुलांच्या लग्नाला प्रोत्साहन देण्यासाठी मुलींना दोन लाख रुपये दिले जातील. शेतकरी कुटुंबातून येणाऱ्या तरुणांसाठी हा एक चांगला निर्णय ठरेल, असेही कुमार स्वामी म्हणाले.

दरम्यान,  कर्नाटक विधानसभा निवडणूक तोंडावर असताना माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली. लक्ष्मण सवदी यांना तिकीट नाकारण्यात आल्यानंतर लगेच एका दिवसानंतर त्यांनी भाजप सोडण्याचा निर्णय जाहीर केला. लक्ष्मण सवदी हे अथणीचे तीन वेळा आमदार राहिले आहेत. पण २०१८ मधील निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार महेश कुमठळ्ळी यांच्याकडून त्यांचा पराभव झाला. काँग्रेसमधील इतर नेत्यांसह कुमठळ्ळी नंतर भाजपमध्ये सामील झाले. यामुळे काँग्रेस-जेडीएस युती सरकार पडले आणि २०१९ मध्ये बी एस येडियुराप्पा यांच्या नेतृत्वाखाली सरकार सत्तेवर आले होते. (Karnataka Assembly elections 2023)

आता अथणीतून सवदी यांचे कट्टर प्रतिस्पर्धी आणि भाजपचे आमदार रमेश जारकीहोळी यांचे निकटवर्तीय असलेले कुमठळ्ळी यांना भाजपने उमेदवारी दिली आहे. यामुळे नाराज झालेल्या लक्ष्मण सवदी यांनी भाजपमधून बाहेर पडण्याचा निर्णय जाहीर केला आहे. “मी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे”, असे सवदी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. त्यांनी सांगितले की ते गुरुवारी संध्याकाळी ठोस निर्णय घेतील आणि शुक्रवारपासून काम सुरू करेन.

हेही वाचा 

Back to top button