कर्नाटक विधानसभा रणधुमाळी : भाजपचे ‘दे धक्का’ धोरण | पुढारी

कर्नाटक विधानसभा रणधुमाळी : भाजपचे ‘दे धक्का’ धोरण

नवी दिल्ली, बेळगाव; पुढारी वृत्तसेवा : भाजपने कर्नाटक विधानसभेसाठी आपली बहुप्रतिक्षित पहिली यादी मंगळवारी रात्री जाहीर करताना दे धक्का धोरण अवलंबले आहे. एकूण 189 जणांची यादी जाहीर करताना बेळगाव उत्तरमधून विद्यमान आमदार अनिल बेनकेंना डावलून त्या जागी डॉ. रवी पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तसेच बेळगाव ग्रामीणमधून नागेश मन्नोळकर आणि अथणीमधून महेश कुमठळ्ळी यांना उमेदवारी देऊन भाजपच्या सत्तेचे सूत्रधार आमदार रमेश जारकीहोळी यांचा आग्रहही पूर्ण केला आहे. त्यामुळे माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांचा पत्ता कट झाला आहे. त्याशिवाय खानापुरातून विठ्ठल हलगेकर यांना उमेदवारी देत माजी आमदार अरविंद पाटील यांचाही पत्ता कट केला आहे. हाही सवदींसाठीच एक धक्का आहे.

हुक्केरीतून निखिल कत्ती आणि चिकोडी मतदारसंघातून माजी खासदार रमेश कत्ती यांना उमेदवारी देत काका-पुतण्याला भाजपने रिंगणात आणले आहे. जिल्ह्यातील इतर मतदारसंघातील उमेदवारी अपेक्षेप्रमाणे आहे. निपाणी मतदारसंघातून मंत्री शशिकला जोल्ले, कागवाडमधून श्रीमंत पाटील, बेळगाव दक्षिणमधून अभय पाटील, गोकाकमधून रमेश जारकीहोळी यांना अपेक्षेप्रमाणे उमेदवारी जाहीर झाली आहे.

बेळगाव जिल्हा पालकमंत्री गोविंद कारजोळ यांचाही पत्ता कट होणार, अशी चर्चा होती. मात्र त्यांना मुधोळमधून उमेदवारी देण्यात आली आहे. तर माजी मुख्यंत्री बी. एस. येडियुराप्पांचे पुत्र बी. वाय. विजयेंद्र यांना शिकारीपुरा मतदारसंघातून रिंगणात उतरवण्यात आले आहे. राष्ट्रीय चिटणीस सी. टी. रवीही चिक्कमंगळूरमधून लढतील.
केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी पहिली यादी दिल्लीत जाहीर केली. तत्पूर्वी मंगळवारी सकाळी ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. त्यानतंर पहिली यादी निश्चित झाली. यादीत 32 उमेदवार ओबीसी, 30 उमेदवारी अनुसूचित जाती, 16 अनुसूचित जमातींचे आहेत. त्याशिवाय एक डॉक्टर, पाच वकील, तीन शिक्षणतज्ज्ञ, बेळगावचे माजी पोलिस आयुक्त भास्कर राव यांच्यासह तीन सरकारी अधिकार्‍यांचाही पहिल्या यादीत समावेश आहे.

भाजपचे ज्येष्ठ नेते ईश्वरप्पा यांची राजकीय निवृत्ती

बंगळूर : विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवार निवडीची कसरत भाजपचे वरिष्ठ नेते करत असतानाच, पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री के. एस. ईश्वरप्पा यांनी राजकारणातून निवृत्ती जाहीर केली आहे. विधानसभा निवडणुका जवळ आल्या असतानाच ईश्वरप्पांंनी निवृत्तीचा निर्णय जाहीर केल्यामुळे भाजपमध्ये सगळे आलबेल नसल्याचे बोलले जाते. ईश्वरप्पांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांना पत्र लिहून निवृत्ती कळवली आहे. त्यांनी पत्रात म्हटले आहे की, मला निवडणुकीच्या राजकारणातून संन्यास घ्यायचा आहे. विधानसभा निवडणुकीत कोणत्याही मतदारसंघासाठी माझ्या नावाचा विचार करू नये. गेल्या 40 वर्षांच्या राजकीय जीवनात ज्यांनी मला बूथस्तरापासून राज्याच्या उपमुख्यमंत्रिपदापर्यंत मानाचे स्थान दिले, त्या पक्षातील सर्व ज्येष्ठांचा मी अनंत आभारी आहे.सध्या शिमोगा येथे वास्तव्यास असलेल्या ईश्वरप्पांनी नड्डा यांना ई-मेलद्वारे पत्र पाठवले आहे. कुंदापूरचे भाजप आमदार हलाडी श्रीनिवासशेट्टी, दावणगिरी उत्तर मतदारसंघाचे आमदार माजी मंत्री एस.ए. रवींद्रनाथ यांनीही निवडणुकीच्या राजकारणातून निवृत्ती जाहीर केली आहे.

माजी मुख्यमंत्री शेट्टर यांची बंडखोरी; अपक्ष लढणार

धारवाड; रवी हिरेमठ : भाजपने माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांना नवोदितांना संधी देऊन निवडणुकीतून माघार घेण्याची सूचना केली असली, तरी शेट्टर यांनी विधानसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय मंगळवारी जाहीर केला.
मंगळवारी हुबळीत पत्रकारांशी बोलताना शेट्टर म्हणाले, मला दिल्लीतून पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांचा फोन आला होता. त्यांनी मला निवडणुकीतून माघार घेण्यास सांगितले. पण मी गेल्या तीन दशकांपासून उत्तर कर्नाटकात स्व. अनंतकुमार, येडियुराप्पा यांच्यासोबत झटून पक्ष बांधला आहे. 1994 पासून हुबळी ग्रामीण आणि नंतर हुबळी-धारवाड मध्य मतदारसंघ जिंकत आलो आहे. माझ्या ज्येष्ठतेचा आणि योगदानाचा पक्षाने आदर करावा. मी भ्रष्टाचाराच्या घोटाळ्यात अडकलेलो नाही किंवा मतदारसंघात सत्ताविरोधी मतही नाही. पक्षाची नवीन पिढीला प्रोत्साहन देण्याची भूमिका असेल तर त्यांनी ते दोन-तीन महिन्यांपूर्वीच सांगायला हवे होते. मी माझ्या मतदारसंघात प्रचाराला सुरुवात केली असून, ती आणखी तीव्र करणार आहे. निवडणुकीच्या रिंगणापासून दूर राहण्याचा प्रश्नच नाही.

माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी काँग्रेसच्या संपर्कात

बंगळूर; आर. एच. नटराज : अंतर्गत मतदानाच्या आधारे भाजपच्या संसदीय मंडळाने उमेदवारांची निवड यादी जाहीर केल्यानंतर अथणीतून लक्ष्मण सवदी यांना डावलण्यात आल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे सवदी काँग्रेस नेत्यांच्या संपर्कात आहेत. सिद्धरामय्यांच्या नेतृत्वाखालील उत्तर कर्नाटकातील लिंगायत समाजाच्या नेत्यांना काँग्रेस आकर्षित करत आहे. अथणी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्याचा आग्रह धरणार्‍या लक्ष्मण सवदी यांना भाजपने उमेदवारी नाकारली आहे. विद्यमान विधान परिषदेचे सदस्य असलेल्यांना उमेदवारी देऊ नये, असा निष्कर्ष काढण्यात आला आहे. त्यानंतर त्यांनी सिद्धरामय्यांशीही चर्चा केली आहे. 2004, 2008 आणि 2013 मध्ये भाजपचे आमदार म्हणून निवडून आलेले सवदी यांना 2018 च्या निवडणुकीत काँग्रेसच्या महेश कुमठळीकडून पराभव पत्करावा लागला होता. 2019 मध्ये महेश कुमठळी ‘ऑपरेशन कमळ’च्या माध्यमातून भाजपमध्ये आले. त्याआधी सवदीना विधान परिषदेवर नियुक्त करून उपमुख्यमंत्रिपद देण्यात आले होते. त्यामुळे आता सवदींना डावलण्यात आले आहे. त्यामुळेच ते काँग्रेसमध्ये जाण्यास इच्छुक आहेत.

Back to top button