कर्नाटक विधानसभा निवडणूक : भाजपची १८० जणांची यादी आज? | पुढारी

कर्नाटक विधानसभा निवडणूक : भाजपची १८० जणांची यादी आज?

नवी दिल्ली, बंगळूर : पुढारी वृत्तसेवा,
कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी भाजपची पहिली १८० जणांची यादी मंगळवारी जाहीर होण्याची शक्यता आहे. सोमवारी यादी निश्चित करण्यासाठी भाजपच्या संसदीय पक्षाची बैठक झाली, पण यादीवर शिक्कामोर्तब होऊ शकले नाही. काही मतदारसंघांबाबत अजूनही अनिश्चितता असल्याने यादीला विलंब होत असल्याची माहिती मुख्यमंत्री बसवराज बोम्मईंनी दिली. तसेच मंगळवारी यादी जाहीर होईल, असेही ते म्हणाले. बेळगाव जिल्ह्यातील सगळ्या विद्यमान आमदारांना उमेदवारी मिळण्याचे संकेत आहेत. त्यामुळए अथणीतून महेश कुमठळ्ळली, कागवाडमधून श्रीमंत पाटील यांची नावे निश्चित मानली जात आहेत. त्या स्थितीत विधान परिषदेचे आमदार लक्ष्मण सवदी यांना उमेदवारी मिळणार नाही.

कर्नाटक विधानसभा निवडणूक

सोमवारी सकाळी भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शहा यांच्या नेतृत्त्वाखाली भाजपच्या संसदीय पक्षाची पुन्हा बैठक झाली. त्या बैठकीत उत्तर प्रदेश आणि गुजरात पॅटर्नप्रमाणे विद्यमान आमदारांना डावलून नव्या चेहऱ्यांना संधी देण्याचा विचार झाला. मात्र बंडखोरीची शक्यता जास्त असल्याने जवळपास सगळ्याच विद्यमान आमदारांना उमेदवारी देण्याचे निश्चित झाले. अपवाद फक्त भ्रष्टाचाराचे आरोप असणाऱ्यांचा आणि वयाची पंत्याहत्तरी पार केलेल्यांचा. त्यामुळे के. एस. इश्वराप्पा, हालाडी श्रीनिवास, रघुपती भट्ट यांचे तिकीट कापले जाणार आहे.

अनेक मतदारसंघांमध्ये भाजपकडून दोघे किंवा तिघे इच्छुक आहेत. त्यातून एकट्याला निवडणे भाजपसाठी कसरतीचे ठरत आहे. संभाव्य बंडखोरी रोखण्यासाठी या सगळ्या इच्छुकांसाठी वैयक्तिकरित्या चर्चा करून त्यांचे पुनर्वसन करण्याची ग्वाही देऊन यादी निश्चित केली जात आहे. त्यामुळेच यादी लांबणीवर पडत आहे. शिवाय सर्वाधिक पाठिंबा मिळणाऱ्या लिंगायत समुदायाबरोबरच अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, दलित आणि वोक्कलिंगांना प्राधान्य देण्याचीही कसरत भाजपला करावी लागत आहे.

हेही वाचा 

Back to top button