Data Protection Bill : संसदेच्या पावसाळी अधिवेशनात डेटा संरक्षण विधेयक सादर केले जाणार :  ऍटर्नी जनरल वेंकटरमणी | पुढारी

Data Protection Bill : संसदेच्या पावसाळी अधिवेशनात डेटा संरक्षण विधेयक सादर केले जाणार :  ऍटर्नी जनरल वेंकटरमणी

पुढारी वृत्तसेवा : नवी दिल्ली,  संसदेच्या आगामी पावसाळी अधिवेशनात डेटा संरक्षण विधेयक सादर केले जाईल, अशी माहिती  ऍटर्नी जनरल आर. वेंकटरमणी यांनी मंगळवारी सर्वोच्च न्यायालयात एका प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान दिली. डेटा संरक्षणाशी संबंधित खटल्यांची सुनावणी न्यायमूर्ती के. एम. जोसेफ यांच्या नेतृत्वाखालील घटनापीठासमोर सुरु आहे. (Data Protection Bill )

न्यायमूर्ती जोसेफ हे येत्या 16 जून रोजी सेवानिवृत्त होत असल्याने नवीन घटनापीठाची स्थापना करावी लागेल. या पार्श्वभूमीवर हा विषय सरन्यायाधीशांकडे सुपूर्द केला जाईल, असे घटनापीठाकडून सांगण्यात आले. विद्यमान घटनापीठातील अन्य न्यायमूर्तींमध्ये अजय रस्तोगी, अनिरुद्ध बोस, ऋषिकेश राॅय आणि सी. टी. रवीकुमार यांचा समावेश आहे. यासंदर्भात पुढील सुनावणी ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात घेतली जाईल, असेही घटनापीठाकडून स्पष्ट करण्यात आले.

सदर प्रकरणाची जोडणी कार्यपालिकेतील प्रक्रियेसोबत केली जाऊ नये, असा  युक्तिवाद याचिकाकर्त्यांकडून ऍड.श्याम दिवाण यांनी केला. कार्यपालिकेची प्रक्रिया दीर्घ असून संसदेकडून या विषयावर विचारविमर्श करण्यासाठी एखादी समिती नेमली जाऊ शकते, असे दिवाण यांनी सांगितले.

हेही वाचा 

Back to top button