पुणे लोकसभा पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादीचीही तयारी; काँग्रेस, राष्ट्रवादीमध्ये जोरदार रस्सीखेच | पुढारी

पुणे लोकसभा पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादीचीही तयारी; काँग्रेस, राष्ट्रवादीमध्ये जोरदार रस्सीखेच

पुणे; पुढारी वृत्तसेवा : खासदार गिरीश बापट यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या पुणे लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आता राष्ट्रवादी काँग्रेसनेही तयारी सुरू केली आहे. पक्षाने संधी दिल्यास निवडणूक लढविण्यास तयार असल्याचे राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी जाहीर केले आहे. तर, पोटनिवडणूक जाहीर झाली नसतानाही अशा पद्धतीची भूमिका म्हणजे असंवेदनशीलतेचा कळस असल्याची टीका पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.

आघाडीत ठिणगीची शक्यता

पुणे लोकसभेची जागा ही काँग्रेसकडे आहे. त्यावर आता राष्ट्रवादीने या जागेची मागणी केल्याने आघाडीत थेट ठिणगी पडण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे काँग्रेसच्या नेत्यांनी पोटनिवडणुकीबाबत केलेल्या वक्तव्यांवर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी टीका केली होती. आता राष्ट्रवादीच्या शहराध्यक्षांनी निवडणुकीबाबत भाष्य केल्याने काँग्रेसकडून त्यावर पलटवार केला जाण्याची शक्यता आहे.

नक्की काय राष्ट्रवादीची भूमिका?

राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष जगताप यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून पक्षाची भूमिका मांडली. ते म्हणाले, ‘सोशल मीडियावर लोकसभा पोटनिवडणुकीबाबत चर्चा सुरू आहे. शहरात दहा वर्षे राष्ट्रवादीची सत्ता होती. तसेच, 2019 मध्ये झालेल्या विधानसभेत पक्षाचे दोन आमदारही आहेत. त्यामुळे ही जागा पक्षाला मिळावी, अशी कार्यकर्त्यांची भूमिका आहे. ती वरिष्ठांना कळविण्यात आली आहे. ही जागा काँग्रेसकडे असली, तरी या जागेबाबत अद्याप चर्चा झालेली नाही. मात्र, पक्षाला ही जागा मिळाल्यास आपण ही निवडणूक लढविण्यास तयार आहोत.’

Back to top button