Covid-19 Updates | कोरोनाची धास्ती वाढली! देशात २४ तासांत ५,६७६ नवे रुग्ण | पुढारी

Covid-19 Updates | कोरोनाची धास्ती वाढली! देशात २४ तासांत ५,६७६ नवे रुग्ण

पुढारी ऑनलाईन : देशात कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येने धास्ती वाढली आहे. गेल्या २४ तासांत कोरोनाचे ५,६७६ नवे रुग्ण आढ‍ळून आले आहेत. यामुळे देशातील सक्रिय रुग्णसंख्या ३७,०९३ वर पोहोचली आहे. याआधीच्या दिवशी देशात कोरोनाचे ५,८८० नवे रुग्ण आढळून आले होते. (Covid-19 Updates)

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, दैनंदिन पॉझिटिव्हिटी रेट २.८८ टक्क्‌ एवढा आहे. आठवड्याचा पॉझिटिव्हिटी रेट ३.८१ टक्के आहे. गेल्या २४ तासांत ५,६७६ नवे रुग्ण आढळून आले असून ३,७६१ रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत.

कोरोना रुग्णसंख्येत ७९ टक्के वाढ

देशात रविवारी संपलेल्या मागील आठवड्यात कोरोना रुग्णसंख्येत ७९ टक्के वाढ दिसून आली. गेल्या आठवड्यात ३६ हजार रुग्णांची नोंद झाली. गेल्या आठवड्यातील रुग्णसंख्या ही सात महिन्यांतील सर्वाधिक आहे. जरी रुग्णसंख्या वाढत असली तरी मृत्यू होण्याचे प्रमाण कमी आहे. ३ एप्रिल ते ९ एप्रिल दरम्यान देशात ६८ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यात महाराष्ट्रातील १५, दिल्ली १०, हिमाचल प्रदेशातील ८, गुजरात ६ आणि कर्नाटकमधील ५ रुग्णांचा समावेश आहे. याआधीच्या आठवड्यातील मृतांचा आकडा ४१ होता. (Covid-19 Updates)

केरळ, महाराष्ट्रात चिंता वाढली

केरळमध्ये गेल्या आठवड्यात रुग्णसंख्या सुमारे अडीच पटीने वाढली आहे. केरळमध्ये गेल्या आठवड्यात ११,२९६ नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर या कालावधीत महाराष्ट्रात ४,५८७ रुग्ण आढळून आले. दिल्लीत ३,८९६, हरियाणात २,१४० आणि गुजरातमध्ये २,०३९ रुग्ण आढळून आले आहेत.

दिल्लीतील पॉझिटिव्हिटी रेट २६ टक्क्यांवर

दिल्लीतील पॉझिटिव्हिटी रेट २६ टक्क्यांवर पोहोचला आहे. दिल्लीत सोमवारी ४८४ कोरोना रुग्णांची नोंद झाली होती. तर तीन रुग्णांचा मृत्यू झाला. रविवारी दिल्लीत ६९९ रुग्ण आढळून आले होते. तर ४ रुग्णांचा मृत्यू झाला होता. कोरोना रुग्णसंख्या सातत्याने वाढत असल्याने दिल्लीचे आरोग्यमंत्री सौरभ भारद्वाज यांनी फ्लू सारखी लक्षणे असलेल्या लोकांना मास्क घालण्याचे आणि सार्वजनिक ठिकाणे जाणे टाळावे असे आवाहन केले.

कोरोना रुग्‍णसंख्‍या वाढण्‍याची ‘ही’ आहेत ३ प्रमुख कारणे

देशात कोरोना रुग्‍णसंख्‍येत अचानक वाढ होण्‍यास IMA ने तीन प्रमुख कारणे सांगितले आहेत. पहिले कारण हे सार्वजनिक ठिकाणी सामाजिक अंतर ( सोशल डिस्‍टंस ) नियमाचे पालन करण्‍याच बंद झाले आहेत. त्‍याचबरोबर देशभरात कोराना चाचणी संख्‍या कमी झाली आहे. त्‍यामुळे कोरोना बाधित रुग्‍णांकडून याचा फैलाव होण्‍याचे प्रमाण वाढले आहे. तर तिसरे प्रमीख कारण म्‍हणजे कोरोना विषाणूचा नवा व्‍हरियंट हे आहे.

काही काळापासून चाचणी दरम्यान कोरोनाचे नवीन प्रकार आढळून येत आहेत. कोरोना विषाणूचे हे नवीन रूप पूर्वीच्या तुलनेत जास्त संसर्गजन्य असल्‍याचे स्‍पष्‍ट होत आहे. INSACOG ने अलीकडेच नोंदवले आहे की भारतातील आतापर्यंतच्या एकूण कोरोना संसर्गाच्या ३८.२ टक्के प्रकरणांसाठी XBB.1.16 प्रकार जबाबदार आहे. (Covid-19 Updates)

हे ही वाचा :

Back to top button