COVID-19 | देशात कोरोनाचे २४ तासांत ५,८८० नवे रुग्ण, सक्रिय रुग्णसंख्या ३५,१९९ वर | पुढारी

COVID-19 | देशात कोरोनाचे २४ तासांत ५,८८० नवे रुग्ण, सक्रिय रुग्णसंख्या ३५,१९९ वर

पुढारी ऑनलाईन डेस्क : देशातील कोरोना रुग्णसंख्येत वाढ सुरुच आहे. गेल्या २४ तासांत कोरोनाचे ५,८८० नवे रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे देशातील सक्रिय रुग्णसंख्या ३५,१९९ वर पोहोचली असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. (COVID-19)

महाराष्ट्रात ७८८ नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर दिल्लीत रविवारी ६९९ रुग्णांची नोंद झाली होती. दिल्लीतील पॉझिटिव्हिटी रेट २१.१५ टक्क्यांवर गेला आहे. दिल्लीत कोरोनामुळे ४ जणांचा मृत्यू झाला आहे. राजस्थानमध्ये १६५ नवे रुग्ण आढळून आले असून एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे.

देशात दिवसेंदिवस कोरोना रूग्णांची संख्या वाढतानाच दिसत आहे. त्यामुळे कोरोनाच्या चाचण्यांमध्येदेखील वाढ करण्यात आली आहे. याआधीच्या दिवशी देशात ५ हजार ३५७ कोरोना रूग्णांची नोंद झाली होती. कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्राने सोमवार आणि मंगळवारी देशव्यापी मॉक ड्रिलचे नियोजन केले आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी राज्याच्या आरोग्यमंत्र्यांना जिल्हा प्रशासन आणि आरोग्य अधिकार्‍यांसह तयारीचा आढावा घेण्याचा सल्ला दिला होता.

कोरोना संक्रमणाच्या  पार्श्वभूमीवर, हरियाणा सरकारने खबरदारीचा उपाय म्हणून सार्वजनिक ठिकाणी आणि शाळांमध्ये मास्क घालणे अनिवार्य केले आहे. जिल्हा प्रशासन आणि पंचायतींनाही कोरोना संबधित नियमावली पाळले जातील याची काळजी घेण्याचे निर्देश दिले आहेत. केरळ सरकारने गरोदर महिला, ज्येष्ठ नागरिक आणि इतर गंभीर आजारांनी ग्रस्त लोकांसाठी मास्क अनिवार्य केले आहे. पुद्दुचेरी प्रशासनाने तात्काळ  सार्वजनिक ठिकाणी मास्क अनिवार्य केले आहे. त्याचबरोबर, उत्तर प्रदेश सरकारने राज्यातील सर्व विमानतळांवर परदेशातून येणाऱ्या प्रवाशांचे स्क्रिनिंग सुनिश्चित करण्याचे निर्देश दिले आहेत. जिनोम सिक्वेन्सिंगसाठी पॉझिटिव्ह आढळलेले नमुने पाठवण्यास सांगण्यात आले आहे.

हे ही वाचा :

Back to top button