प्रियांका गांधी म्हणाल्या,मंत्र्याच्या राजीनाम्यापर्यंत लढत राहू | पुढारी

प्रियांका गांधी म्हणाल्या,मंत्र्याच्या राजीनाम्यापर्यंत लढत राहू

वाराणसी ; वृत्तसंस्था : देशाच्या गृह राज्यमंत्र्याचा मुलगा लखीमपुरात गाडीखाली शेतकर्‍यांना चिरडतो आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ त्याचा बचाव करतात? पंतप्रधान नरेंद्र मोदी लखनौला येतात; पण शेतकर्‍यांचे अश्रू पुसायला लखीमपुरात येत नाहीत, अशी तोफ काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी-वधेरा यांनी डागली. केंद्रीय गृह राज्यमंत्री राजीनामा देेत नाहीत तोवर आम्ही लढत राहू, असा निर्धार त्यांनी वाराणसीतील जगतपूरमध्ये रविवारी झालेल्या काँग्रेसच्या ‘किसान न्याय’ सभेत व्यक्त केला.

प्रियांका म्हणाल्या, मी लखीमपुरात जात होते, तर प्रत्येक रस्त्यावर पोलिसांचा पहारा होता. सरकारला गुन्हेगाराच्या नव्हे, तर माझ्या अटकेची घाई लागली होती. पोलीस स्वत: गुन्हेगाराला आमंत्रण पाठवत आहेत, असे द़ृश्य जगातील कुठल्या देशात कुणी पाहिले आहे काय, असा सवालही त्यांनी केला. पंतप्रधानांनी 2 वर्षांत स्वत:साठी 16 हजार कोटींची दोन विमाने घेतली. एअर इंडिया एका मित्राला विकून टाकली. दलित, आदिवासी आणि महिलांसह सर्वच जण या सरकारमध्ये असुरक्षित आहेत, असा आरोप त्यांनी केला.

राहुल गांधी राष्ट्रपतींची भेट घेणार

लखीमपूर खिरी हिंसाचारप्रकरणी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसच्या सात सदस्यीय शिष्टमंडळाने राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे भेटीसाठी वेळ मागितली आहे. संबंधित मंत्र्याविरुद्ध कारवाई झालेली नाही. त्यामुळे या प्रकरणातील तथ्ये सादर करण्यासाठी शिष्टमंडळ भेट घेणार असल्याचे निवेदन काँग्रेसने दिले आहे. या शिष्टमंडळात ए. के. अँटोनी, मल्लिकार्जुन खर्गे, गुलाम नबी आझाद, प्रियांका गांधी-वधेरा, के. सी. वेणुगोपाल, अधीर रंजन चौधरी यांचा समावेश असणार आहे.

काशी विश्वनाथाचे दर्शन

प्रियांका गांधी यांनी काशी विश्वनाथ मंदिरात जाऊन षोडशोपचार पूजन केले. नंतर त्यांनी अन्नपूर्णा आणि कुष्मांडा मातेचे दर्शन घेतले.

हिंदू-शिखांत वाद पेटविण्याचा प्रयत्न : वरुण गांधी

लखीमपुरात हिंदू विरुद्ध शीख असा वाद पेटवण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा आरोप भाजपचे खासदार वरुण गांधी यांनी केला.वरुण यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, लखीमपूर प्रकरणाला हिंदू विरुद्ध शीख असे वळण देण्याचा प्रयत्न झाला आहे. हे अनैतिक आणि चुकीचे आहे. किरकोळ राजकीय फायद्यापेक्षा राष्ट्रीय एकता जास्त महत्त्वाची आहे, असेही त्यांनी म्हटले आहे. या आधीही वरुण यांनी या घटनेचा व्हिडीओ ट्विट केला होता.

Back to top button