देशातील वीज निर्मिती केंद्रांना गॅसचा अखंडित पुरवठा सुरू राहील : केंद्रीय ऊर्जा मंत्री | पुढारी

देशातील वीज निर्मिती केंद्रांना गॅसचा अखंडित पुरवठा सुरू राहील : केंद्रीय ऊर्जा मंत्री

नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा

देशभरातील वीज निर्मिती केंद्रांना आवश्यक प्रमाणात गॅसचा अखंडित पुरवठा करण्याचे निर्देश ‘गेल’च्या सीएमडींना देण्यात आले आहेत. हा पुरवठा अखंडितरित्या सुरू राहील असे आश्वासन त्यांनी दिले असल्याची माहिती रविवारी केंद्रीय ऊर्जा मंत्री आर.के.सिंह यांनी दिली. देशातील वीज निर्मिती केंद्रांमध्ये कोळशाचा मुबलक साठा शिल्लक नसल्याने मोठे वीज संकट निर्माण होण्याची शक्यता वर्तवली आहे.राष्ट्रीय राजधानी दिल्लीत देखील वीज पुरवठा खंडित होण्याची भीती वर्तवली जात असताना सिंह यांनी ऊर्जा मंत्रालय, बीएसईएस तसेच टाटा पॉवरच्या अधिकार्यांसोबत तातडीची बैठक घेत आवश्यक दिशानिर्देश दिल्याची माहिती समोर आली आहे. राजधानीत वीजेच्या मागणीप्रमाणेच वीज पुरवठा केला जात असून, भविष्यातही अखंडितरत्यिा वीज पुरवठा केला जाईल, असे बैठकीनंतर सिंह यांनी स्पष्ट केले.

वीज निर्मिती केंद्रांमध्ये करण्यात येणाऱ्या गॅसचा पुरवठा अखंडितरित्या सुरू आहे. यापूर्वी गॅसचा तुटवडा नव्हता आणि भविष्यातही राहणार नाही, अशी ग्वाही सिंह यांनी यानिमित्ताने दिली. देशात रविवारी चार दिवसांहून अधिक काळ परेल एवढा कोळशाचा साठा शिल्लक असून दररोज कोळशाचा पुरवठा केला जातो. शनिवारी जेवढ्या प्रमाणात कोळशाचा वापर केला गेल्या तेवढ्या कोळशाचा स्टॉक आज आला आहे. केंद्रीय कोळसा आणि खाण मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या संपर्कात असल्याचे सिंह यावेळी म्हणाले.

राजधानी दिल्लीला वीज पुरवठा करणार्या वीज निर्मिती केंद्रांना तात्काळ कोळसा पुरवण्यात आला नाही, तर दोन दिवसांनंतर राष्ट्रीय राजधानी क्षेत्रात पुर्णत: ‘ब्लॅकऑऊट’ होवू शकतो, अशी भीती दिल्लीचे उर्जा मंत्री सत्येंद्र जैन यांनी शनिवारी बोलून दाखवली होती. राजधानीत ही स्थिती निर्माण होवू नये यासाठी सरकार महागडी वीज खरेदी करण्यास ही तयार असल्याचे जैन यांनी स्पष्ट केले होते.

यापूर्वी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी राज्याला वीज संकटाचा सामना करावा लागू शकतो, असा इशारा दिला होता. वैयक्तिक रित्या या सर्व स्थितीवर लक्ष ठेवून आहे.ही स्थिती उद्भवून नये यासाठी पुर्णपणे प्रयत्न केला जात आहे, असे ट्विट केजरीवाल यांच्याकडून करण्यात आले होते. शनिवारी केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना यासंबंधी पत्र लिहून कोळशाच्या तुटवड्यासंबंधीच्या स्थितीकडे त्यांचे लक्ष वेधले होते. याप्रकरणात पंतप्रधानांनी लक्ष घालण्याची विनंती केजरीवाल यांच्याकडून करण्यात आली होती, हे विशेष.

Back to top button