CNG PNG Price : सीएनजी-पीएनजीचे दर आजपासून कमी होणार; वाचा नवीन दर | पुढारी

CNG PNG Price : सीएनजी-पीएनजीचे दर आजपासून कमी होणार; वाचा नवीन दर

पुढारी ऑनलाईन डेस्क : केंद्र सरकारने घरगुती नैसर्गिक वायूच्या किंमती निश्चित करण्यासाठी नवीन सूत्र मंजूर केले आहे. यासोबतच पाईपद्वारे पुरवल्या जाणाऱ्या सीएनजी आणि एलपीजीच्या किमतीची कमाल मर्यादाही निश्चित करण्यात आली आहे. त्यामुळे सीएनजी आणि पीएनजीच्या किंमती 10 टक्क्यांनी कमी होणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत किरीट पारीख समितीच्या नैसर्गिक वायूच्या शिफारशींना मंजुरी देण्यात आली आहे. त्यानुसार आजपासून देशातील सीएनजी आणि पीएनजीच्या किमती कमी होणार. (CNG PNG Price)

माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी सांगितले आहे की, पारंपरिक क्षेत्रातून तयार होणारा नैसर्गिक वायू (APM) आता अमेरिका-रशिया सारख्या कच्च्या तेलाच्या किमतींशी जोडला जाईल. यापूर्वी गॅसच्या किमतीच्या आधारे किंमत निश्चित केली जात होती. आता एपीएम गॅसची किंमत भारतीय बास्केटमधील कच्च्या तेलाच्या किमतीच्या १० टक्के असेल. तथापि, ही किंमत प्रति दशलक्ष ब्रिटिश थर्मल युनिट (MMBtu) $६.५ पेक्षा जास्त असणार नाही. मूळ किंमत $५ प्रति mmBtu ठेवण्यात आली आहे. सध्याची गॅस किंमत $८.५७ आहे.

दर महिन्याला किमती निश्चित केल्या जातील

नवीन फॉर्म्युलामध्ये दोन वर्षांसाठी कमाल मर्यादा कायम राहणार आहे. त्यानंतर प्रति mmBtu $0.25 ची वार्षिक वाढ होईल. सीएनजी-पीएनजीचे दर आता दर महिन्याला निश्चित केले जातील. सध्या दर सहा महिन्यांनी दर निश्चित केले जातात. गॅस उत्पादनाला प्रोत्साहन देण्यासाठी, अतिरिक्त उत्पादनावर २० टक्के प्रीमियम देण्याचा प्रस्ताव आहे. विद्यमान उत्पादकांनी गॅस उत्पादन वाढविल्यास, घोषित किमतीव्यतिरिक्त त्यांना २० टक्के प्रीमियमच्या स्वरूपात प्रोत्साहन दिले जाईल. यामुळे उत्पादकांना नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून उत्पादन वाढविण्यास प्रोत्साहन मिळेल.

CNG PNG Price : जीएसटी अंतर्गत आणण्याची शिफारस

पारिख समितीनेही गॅस जीएसटीच्या कक्षेत आणण्याची शिफारस केली आहे. यामध्ये गॅसवर तीन टक्के ते २४ टक्के असा सर्वसाधारण कर लावण्याची शिफारस करण्यात आली आहे. यामुळे गॅस मार्केटला चालना मिळण्यास मदत होईल.

एका वर्षात किमतीत ८० टक्के वाढ

आंतरराष्ट्रीय बाजारात ऊर्जेच्या किमती वाढल्यामुळे देशात सीएनजी आणि पीएनजीच्या किमती एका वर्षात ८० टक्क्यांनी वाढल्या आहेत.
या निर्णयामुळे दिल्लीतील सीएनजी आणि पीएनजीच्या किमती 6 रुपयांपर्यंत कमी होऊ शकतात. सध्या दिल्लीत सीएनजी ७९.५६ रुपये प्रति किलो आणि पीएनजी ५३.५९ रुपये प्रति हजार क्यूबिक मीटर आहे. त्याचवेळी मेरठमध्ये सीएनजी ८ रुपयांनी आणि पीएनजी ६.५० रुपयांनी स्वस्त होऊ शकतो.

हेही वाचा 

Back to top button