पुढारी ऑनलाईन: मध्यप्रदेशातील श्योपूर जिल्हयात असलेल्या कुनो नॅशनल पार्कमधून पळालेला ओबान चित्त्याला तब्बल सहा दिवसांनी जेरबंद करण्यात यश आले आहे. गुरूवारी (दि.०६) येथील एका भागात 'ओबान' हा चित्ता दिसला होता. त्यानंतर गुरूवारी संध्याकाळी दक्षिण आफ्रिकेच्या टीमने रेस्क्यू ऑपरेशन करून त्याला पकडण्यात यश आले आहे. या नर चित्त्याला शिवपुरी जिल्ह्यातून ताब्यात घेण्यात आले आहे. मात्र, अद्याप कुनो नॅशनल पार्कमधून ओबान चित्त्यासोबत पळालेली 'आशा' नावाची चित्ता मादी परतलेली नाही; असे देखील वनअधिकाऱ्यांनी सांगितल्याचे वृत्त एएनआयने दिले आहे.
वनअधिकाऱ्यांनी वृत्तवाहिन्यांनी दिलेल्या माहितीनुसार, 'ओबान' चित्त्याला पकडल्यानंतर गावकऱ्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. सहा दिवसांपूर्वी कुनो नॅशनल पार्कमधून ओबान नावाचा नर चित्ता पळून गेला होता. जो गेल्या तीन दिवसांपासून शिवपुरी जिल्ह्यातील बैराड तहसील परिसरातील जंगलाला लागून असलेल्या निवासी भागात फिरत होता. गुरुवारी (दि.०६) सायंकाळी दक्षिण आफ्रिकेच्या विशेष पथकाने बैराड तहसील परिसरातील डबरपुरा गावच्या जंगलातून त्याची सुटका करून पकडले.
'ओबान' चित्ता उद्यानाच्या हद्दीतून बाहेर येताच, कुनो नॅशनल पार्कची टीम चित्त्याच्या प्रत्येक हालचालीवर बारीक नजर ठेवून होती. यासोबतच गेल्या तीन दिवसांपासून पोहरी वनविभाग आणि पोलिसांचे पथकही चितेच्या संरक्षणात तैनात होते. गुरुवारी(दि.०६) सकाळी गाझीगड गावातील जंगलातून चित्ता बाहेर आला आणि डबरपुरा गावातील जंगलाशेजारील शेतात पोहोचला. बुधवारी (दि.०५) 'ओबान'ने जौराई गावच्या जंगलात चितळची शिकारही केली होती.
कुनो जंगलातून पळालेल्या 'ओबान' या नर चित्त्याला आफ्रिकन रेस्क्यू टीमने पकडले आहे. परंतु, 'आशा' नावाची मादी अजूनही वन कर्मचाऱ्यांच्या नजरेतून दूर आहे. 'आशा' आणि 'ओबान' हे दोन्ही चित्ता गेल्या चार दिवसांपासून कुनो नॅशनल पार्कच्या बाहेर असून, तिच्यावर वनविभागाचे कर्मचारी लक्ष ठेवून आहेत. कुनोच्या बफर झोन अंतर्गत येणाऱ्या वीरपूर परिसरातील प्रसिद्ध धौरेत सरकार मंदिराच्या जंगलात गुरुवारी आषाढ सायर बाबांच्या जागेभोवती दिसली. याच्या भोवती घनदाट जंगलही आहे आणि आजूबाजूला नैसर्गिक पाण्याचे झरे आहेत. इतर वन्यजीवही इथे मोठ्या प्रमाणात असल्याचे वनअधिकाऱ्यांनी सांगितले आहे.