पुढारी ऑनलाईन : केरळमधील कोझिकोडमधील एलाथूरजवळ चालत्या ट्रेनमध्ये एकाने आपल्या सहप्रवाशाला पेटवून दिले होते. यामध्ये जळलेल्या व्यक्तीसोबतच आठ सहप्रवासी जखमी झाले होते. यातील तिघांचा मृत्यू झाला. दरम्यान, या घटनेत केंद्रीय गुप्तचर यंत्रणा आणि महाराष्ट्र एटीएसच्या संयुक्त पथकाने कारवाई करत महाराष्ट्रातील रत्नागिरीतून संशयित आरोपी शाहरुख सैफी याला ताब्यात घेतले होते. यानंतर त्याला कोर्टासमोर हजर केले असता त्याला १४ दिवसांची न्यायालयीने कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान त्याच्यावर येथील सरकारी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. यामुळे आज पोलिस अधिकारी आणि न्यायाधिशांनी थेट रूग्णालयात जाऊन पुढील न्यायालयीन कार्यवाही केली असल्याचे वृत्त एएनआयने दिले आहे.
कोझिकोड रेल्वे आगीची घटनेत संशयित आरोपीला अटक केल्यानंतर, मुन्सिफ मॅजिस्ट्रेट न्यायाधीशांनी संशयित आरोपी शाहरुख सैफी याची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. न्यायाधिशांनी संशयित आरोपी शाहरुख सैफीला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. आरोपींवर केरळमधील कोझिकोड येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात उपचार सुरू राहणार आहेत. याप्रकरणातील पुढील तपासासाठी आज (दि.०७) शहर पोलीस आयुक्त राजपाल मीना आणि मुन्सिफ मॅजिस्ट्रेट न्यायाधीश यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात हजेरी लावली.
रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, घटनेदरम्यान प्रवाशांनी आपत्कालीन साखळी ओढल्यानंतर रेल्वेचा वेग कमी झाला, तेव्हा संबंधित संशयित पळून जाण्यात यशस्वी झाला. यानंतर इतर प्रवाशांनी रेल्वे संरक्षण दलाला (आरपीएफ) माहितीनंतर सुरक्षा रक्षकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत आग तातडीने आटोक्यात आणली. जखमींपैकी काही व्यक्तींनी मीडियाला दिलेल्या माहितीनुसार, अज्ञात हल्लेखोराने पेट्रोल किंवा रॉकेल असे ज्वलनशील पदार्थ टाकून आग लावली.
एका महिला प्रवासी म्हणाली की, तिला पाण्याचे थेंब तोंडावर पडल्यासारखे वाटले. यानंतर अचानक आगीचा भडका उडाला. जेव्हा ट्रेन एलाथूर पुलावर पोहोचली तेव्हा ती थांबली आणि प्रवासी घाबरून एका डब्यातून बाहेर पडताना दिसले. दरम्यान या घटनेनंतर रेल्वेतील एकच खळबळ उडाली. प्रवशांमध्ये चेंगराचेंगरी झाली असल्याची माहिती अन्य सहप्रवाशांनी दिली आहे.