

पुढारी ऑनलाईन डेस्क : संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशीही विविध मुद्द्यांवरून विरोधी पक्षांच्या खासदारांनी लोकसभेत गदारोळ घातला. त्यामुळे लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी सभागृहाचे कामकाज अनिश्चित काळासाठी तहकूब करण्याची घोषणा केली. विरोधकांच्या गोंधळामुळे राज्यसभेचेही कामकाजही आज सुरू होऊ शकले नाही. त्यामुळे सभापती जगदीप धनखड यांनी सभागृहाचे कामकाज दुपारी २ पर्यंत स्थगित केले.
संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस आहे. दुसऱ्या टप्प्यात संसदेच्या दोन्ही सभागृहात दररोज गदारोळ झाला, त्यामुळे अध्यक्षांना अनेकवेळा कामकाज तहकूब करावे लागले. या काळात काही विधेयके चर्चेविनाच मंजूर करण्यात आली. आज अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशीही विरोधी पक्षाच्या खासदारांनी दोन्ही सभागृहात गोंधळ घातला आणि घोषणाबाजी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील आज सभागृहात उपस्थितीत होते. यावेळी विरोधी पक्षाच्या खासदारांनी वेलमध्ये येऊन राहुल गांधी जिंदाबादच्या घोषणा दिल्या. गदारोळामुळे लोकसभेचे कामकाज आजही सुरू होऊ शकले नाही.
लोकसभेत गदारोळ सुरू असतानाच सभापती ओम बिर्ला यांनी विरोधकांना रात्री उशिरापर्यंत सभागृह चालवण्याची आठवण करून दिली. सभागृह चालवण्यासाठी आम्ही प्रत्येक विषयावर चर्चा करण्यास तयार आहोत, असे सभापतींनी सांगितले. पण आपल्याला सभागृह चालवू द्यायचे नाही. संसदीय परंपरेसाठी हे चांगले नसल्याचे त्यांनी विरोधी पक्षाच्या खासदारांना सुनावले. विरोधकांच्या गदारोळातच सभागृहाचे कामकाज सुरळीत पार पाडण्यासाठी संसदेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केलेल्या सहकार्याबद्दल अध्यक्षांनी त्यांचे आभार मानले आणि वंदे मातरमसाठी सर्व सदस्यांना आपापल्या जागेवर उभे राहण्यास सांगितले. वंदे मातरम नंतर अध्यक्ष बिर्ला यांनी सभागृहाचे कामकाज अनिश्चित काळासाठी तहकूब करण्याची घोषणा केली.
हेही वाचा :