

बंगळूर; पुढारी वृत्तसेवा : विधानसभा निवडणुकीसाठी राज्य भाजपने पहिल्या टप्प्यात 161 उमेदवारांची यादी निश्चित केली असून, ती केंद्रीय निवडणूक समितीकडे मंजुरीसाठी पाठवली आहे. मात्र याद्यांची अधिकृत घोषणा बाकी आहे. दिल्लीहून घोषणा 8 एप्रिलनंतर होण्याची शक्यता आहे. काँग्रेसने आपली पहिली यादी 25 मार्च रोजी म्हणजे निवडणुकीची घोषणा होण्याची आधीच जाहीर केली होती. ती 124 जणांची असून, आता 100 मतदारसंघातील उमेदवारांची घोषणा बाकी आहे. तर भाजपने आपली पहिली यादी 161 जणांची बनवली असून, ती केंद्रिय निवड समितीकडे पाठवली आहे.
निश्चित झालेल्या यादीबाबत बोलताना प्रदेशाध्यक्ष नलीनकुमार कटील म्हणाले, एका विधानसभा मतदारसंघासाठी तीन नावे केंद्रीय निवडणूक समितीकडे पाठविण्यात आली होती. उमेदवार निवडीची जबाबदारी छाननीकर्त्यांवर देण्यात आली होती. आम्ही आता फक्त नावांची शिफारस करत आहोत. यादीची घोषणा लवकरच होईल. इच्छुकांनी कोणत्याही प्रकारची नाराजी बाळगू नये. त्यांना हायकमांडचा निर्णय मान्य करावा लागेल. गेले चार दिवस केंद्रातील नेत्यांनी बंगळूरमध्ये बैठका घेऊन बूथ प्रमुखांची मते जाणून घेतली होती. त्यानंतर ही यादी बनवण्यात आली आहे. या यादी निपाणीतून विद्यमान मंत्री शशीकला जोल्ले, गोकाकमधूनभाजप सरकारचे किंगमेकर रमेश जारकीहोळी, अथणीतूनमाजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांच्यासह शिग्गावर मतदारसंघातून मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या बहुतांशी मंत्री आणि ज्येष्ठ नेत्यांची नावे आहे.
सरकारी नोकरीत असलेल्या लोकांना टपालाद्वारे मतदान करण्याची सोय होती. सर्वात पहिल्यांदा या मतांची मोजणी होते. त्यामुळे या मतांकडे अनेकांचे लक्ष असते किंबहुना याच मतांवरून निकालाचा कल दिसून येतो. पण, यंदा सरकारी नोकरच नाही, तर 80 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगही घरातूनच मतदान करणार आहे. जिल्ह्यात ही संख्या तब्बल 1 लाख 40 हजार इतकी आहे. त्यामुळे यंदाच्या निकालाला विशेष महत्व येणार आहे.
आजपर्यंत जो ज्येष्ठ मतदार आहे, त्याला एखादा कार्यकर्ता मतदान केंद्रावर नेतो, त्याठिकाणी स्वत:च मतदान करतो, अशा मतदारांची ने-आण करण्यासाठी विशेष वाहनांची सोय उमेदवारांकडून होते. बर्याचदा या ज्येष्ठांची ने-आण करताना उमेदवार आणि समर्थकांत वादाच्या ठिणग्या पडत असतात. पण, यावर आता निवडणूक आयोगानेच तोडगा काढला आहे. त्यानुसार यंदा 80 वर्षांवरील ज्येष्ठ आणि दिव्यांगांना घरातूनच मतदान करता येणार आहे. जिल्ह्यातील 18 मतदारसंघांत 1 लाख 19 मतदारांनी वयाची 80 वर्षे पार केली आहेत. तर 41 हजार 720 जण दिव्यांग मतदार आहेत.