भारतीय अर्थव्यवस्था सुस्थितीत, चालू आर्थिक वर्षात जीडीपी दर ६.३ टक्के राहणार : World Bank | पुढारी

भारतीय अर्थव्यवस्था सुस्थितीत, चालू आर्थिक वर्षात जीडीपी दर ६.३ टक्के राहणार : World Bank

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : चालू आर्थिक वर्षातील देशाचा जीडीपी दराचा अंदाज जागतिक बँकेने (World Bank) कमी केला असून याआधीच्या ६.६ टक्क्यांच्या तुलनेत ६.३ टक्के इतका विकास दर राहील, असे बँकेने आपल्या ताज्या अहवालात म्हटले आहे. गत डिसेंबर महिन्यात ६.६ टक्के दराचा अंदाज वर्तविण्यात आला होता.

महागडे होत असलेले कर्ज, घटते उत्पन्न आणि आव्हानात्मक बाह्य स्थिती याचा परिणाम भारतीय अर्थव्यवस्थेवर होणे अटळ असून यामुळे जीडीपी दराचा अंदाज काही प्रमाणात कमी केला जात आहे. घटत्या उत्पन्नाचा परिणाम खासगी वस्तू विक्रीवर होण्याची शक्यता आहे. आव्हाने बऱ्यापैकी असली तरी वेगाने विकसित होत असलेल्या देशांत भारत आघाडीवर राहील, असे जागतिक बँकेने अहवालात नमूद केले आहे. मागील काही काळापासून देशाला महागाईचा सामना करावा लागत आहे. पण वर्ष २०२३-२४ मध्ये महागाईपासून काही प्रमाणात दिलासा मिळेल. या वर्षात महागाई दर ५.२ टक्क्यांच्या आसपास राहील, असेही अहवालात म्हटले आहे.

चालू आर्थिक वर्ष २०२४ मध्ये भारताच्या अर्थव्यवस्था वाढीचा दर (GDP) ६.३ टक्के इतका मध्यम राहण्याचा अंदाज जागतिक बँकेने (World Bank) वर्तवला आहे. याआधी विकास दर ६.६ टक्के दराने वाढण्याचा अंदाज वर्तवला होता. गेल्या आर्थिक वर्षाच्या उत्तरार्धात काही प्रमाणात अर्थव्यवस्था संतुलित असतानाही भारताची जीडीपी वाढ लवचिक राहण्याची अपेक्षा असल्याचे जागतिक बँकेने मंगळवारी जारी केलेल्या ताज्या अहवालात व्यक्त केली आहे. जागतिक बँकेने द इंडिया डेव्हलपमेंट अपडेटमध्ये ठळकपणे नमूद केले आहे की, कमी उत्पन्नामुळे वापरात घट झाल्यामुळे आर्थिक वर्ष २०२४ मध्ये देशाचा विकास दर ६.३ टक्क्यांपर्यंत मध्यम राहण्याची अपेक्षा आहे.

भारताचा किरकोळ महागाई दर आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये ६.६ टक्क्यांवरून ५.२ टक्क्यांपर्यंत कमी होईल. तसेच चालू खात्यातील तूट (CAD) या वर्षात ५.२ टक्के राहण्याची शक्यता आहे. “जागतिक बँकेने आर्थिक वर्ष २०२३-२४ मधील GDP चा अंदाज ६.६ टक्के (डिसेंबर २०२२) वरून ६.३ टक्के केला आहे. संथगतीने होणारी वाढ आणि आव्हानात्मक बाह्य परिस्थितीमुळे अर्थव्यवस्था वाढ मर्यादित राहण्याची अपेक्षा आहे. कर्ज खर्चातील वाढ आणि संथगतीने उत्पन्न वाढ याचा खाजगी वापर वाढीवर परिणाम होईल,” असे अहवालात म्हटले आहे.

जागतिक बँकेने म्हटले आहे की कोरोना महामारीच्या काळात मोठ्या प्रमाणात नोकऱ्या कमी केल्याने उत्पादन आणि बांधकाम क्षेत्रांच्या विकास दरावर परिणाम झाला. पण महामारीनंतर श्रमिक बाजारातील परिस्थिती सुधारत असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.

‘मुडीज’ चा अंदाज काय सांगतो?

२०२३-२४ मध्ये जीडीपी दर ५.५ टक्क्यांच्या आसपास राहील, असा अंदाज जागतिक स्तरावरील पतमापन संस्था मुडीजने याआधी वर्तविला होता. सदर वर्षात ४.८ टक्के जीडीपी दराचा अंदाज याआधी मुडीजने वर्तवला होता. केंद्रीय अर्थसंकल्पात भांडवली खर्चाच्या तरतुदीमध्ये सरकारने मोठ्या प्रमाणात वाढ केलेली आहे. त्यामुळे अर्थव्यवस्थेला बळ मिळेल आणि जीडीपी दर साडेपाच टक्क्यांवर जाईल, असे मुडीजने आपल्या अहवालात नमूद केले होते. दरम्यान चालू आर्थिक वर्षातील जीडीपी दराचा अंदाज मात्र या संस्थेने कमी केला असून चालू वर्षी सात टक्क्यांच्या तुलनेत ६.८ टक्के इतका विकासदर साध्य होईल, असे मुडीजने म्हटले होते.

 हे ही वाचा :

Back to top button