‘एससीओ’ बैठकीत अजित डोवालांनी चीन आणि पाकिस्‍तानला सुनावले खडेबोल, “दहशतवादाचे कृत्‍य …” | पुढारी

'एससीओ' बैठकीत अजित डोवालांनी चीन आणि पाकिस्‍तानला सुनावले खडेबोल, "दहशतवादाचे कृत्‍य ..."

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : ‘एससीओ’ देशांमधील राष्‍ट्रीय सुरक्षा सल्‍लागरांच्‍या बैठकीला आजपासून ( दि. २९) सुरुवात झाली आहे. या बैठकीत भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (एनएसए) अजित डोवाल यांनी चीन आणि पाकिस्‍तानला खडेबोल सुनावले. दहशतवादाचे कोणतेही कृत्‍य असो त्‍यामागील हेतू कोणताही असू याचा निषेध झालाच पाहिजे, अशा शब्‍दात त्‍यांनी भारताची भूमिका स्‍पष्‍ट केली.

दहशतवादी कृत्याचा निषेध केला पाहिजे

यंदा शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन (एससीओ)चे अध्यक्षपद भारताकडे आहे. आज ‘एससीओ’ देशांच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची बैठक सुरू झाली आहे. यामध्‍ये पाकिस्‍तान आणि चीन हे एनएससी व्हर्चुअली सहभागी झाले आहेत. बैठकीच्या सुरुवातीला अजित डोवाल म्हणाले की, ‘कोणत्याही दहशतवादाच्या कृत्याचा, त्यामागील कारण काहीही असो, त्याचा निषेध केला पाहिजे’. यावेळी डोवाल यांनी चीनच्या विस्तारवादी धोरणावर आणि पाकिस्तानच्या ‘दहशतवादाला खतपाणी घालण्‍याच्‍या कृत्‍यांवर जोरदार हल्‍लाबोल केला.

दहशतवाद कोणत्याही स्वरूपाचा असो तो आंतरराष्ट्रीय सुरक्षेला धोका आहे. सर्व देशांनी दहशतवादाचा सामना करण्यासाठी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या ठरावांसह दहशतवादविरोधी आपले कर्तव्‍य पूर्ण केलेच पाहिजे, असेही त्‍यांनी ठणकावले.

अलीकडच्या काळात जागतिक सुरक्षेची परिस्थिती अनेक आव्हानांना तोंड देत आहे. या आव्हानांच्या प्रभावामुळे शांघाय कॉर्पोरेशन ऑर्गनायझेशन ( एससीओ ) क्षेत्रावरही परिणाम झाला आहे. सदस्य देशांनी एकमेकांच्या सार्वभौमत्व, प्रादेशिक अखंडता आणि सीमांचा परस्पर आदर केला पाहिजे, अशी अपेक्षाही त्‍यांनी अजित डोवाल यांनी व्‍यक्‍त केली.

शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन

शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन ( एससीओ) मध्ये भारतासह पाकिस्तान, चीन, रशिया, कझाकिस्तान, किर्गिस्तान, ताजिकिस्तान आणि उझबेकिस्तान यांचा समावेश आहे. तसेच अफगाणिस्तान, बेलारूस, इराण आणि मंगोलिया हे चार निरीक्षक देश आहेत. आर्मेनिया, अझरबैजान, कंबोडिया, नेपाळ, श्रीलंका आणि तुर्की हे देश संवाद भागीदार आहेत.

हेही वाचा :

 

Back to top button