पुढारी ऑनलाईन : ज्या मुलभूत संगणकीय कोडवर ट्विटर सोशल नेटवर्क साईट काम करते. हा ट्विटरचा सोर्स कोडच ऑनलाईन लीक झाला असल्याची माहिती समोर आली आहे. हा कोड लीक झाल्याने याचा संपूर्ण ट्विटरवर परिणाम होऊ शकतो. या घटनेमुळे ट्विटरचे सर्वेसर्वा एलन मस्क यांची चिंता वाढली आहे.
ट्विटरचा सोर्स कोड ऑनलाइन लीक झाल्याप्रकरणी ट्विटरने कॅलिफोर्नियाच्या जिल्हा न्यायालयात तक्रार दाखल केले आहे. ट्विटरने प्राधिकरणाच्या मान्यतेशिवाय गिटहबवर त्यांचा ट्विटरचा स्त्रोत असलेला कोड पोस्ट केला असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. तसेच सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटची इंटरनेट होस्टिंग सेवा देणाऱ्या गिटहबला ट्विटरचा सोर्स कोड हटवण्यास सांगिण्यात आले आहे. तसेच याप्रकरणामुळे ट्विटरने कॉपीराइटचे उल्लंघन झाल्याचे आपल्या तक्रारीत म्हटले आहे. ट्विटरच्या या तक्रारीनंतर गिटहबने ट्विटरचा सोर्स कोड आपल्या सेवेतून काढून टाकला आहे.
एलन मस्क यांनी अलीकडेच ट्विट करून ३१ मार्चपर्यंत ट्विटर वापरत असलेल्या ट्विटचा सोर्स कोड उघडेल, असे स्पष्ट केले होते. मस्क यांनी यासंबंधी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले होते की, ट्विटचा अल्गोरिदम अत्यंत गुंतागुंतीचा आहे आणि कंपनीला आंतरिकरित्या देखील तो पूर्णपणे समजलेला नाही. ट्विटरच्या मालकीकडून सोर्स कोड येण्याआधीच तो ऑनलाइन लीक झाल्याने हा ट्विटरसाठी मोठा धक्का मानला जात आहे.