भाजपमध्‍ये मोठे फेरबदल : सीपी जोशी राजस्‍थानच्‍या तर सम्राट चौधरी बिहार प्रदेशाध्‍यक्षपदी | पुढारी

भाजपमध्‍ये मोठे फेरबदल : सीपी जोशी राजस्‍थानच्‍या तर सम्राट चौधरी बिहार प्रदेशाध्‍यक्षपदी

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : आगामी विधानसभा निवडणुकीच्‍या पार्श्वमूमीवर भाजपने पक्षात मोठे बदल केले आहेत. राजस्‍थान, बिहार आणि ओडिशा राज्‍यांमध्‍ये नेतृत्त्‍वात बदल करण्‍यात आला आहे. राजस्‍थान प्रदेशाध्‍यक्षपदी खासदार सी. पी. जोशी, तर बिहार आणि ओडिशाच्‍या प्रदेशाध्‍यक्षपदी अनुक्रमे सम्राट चौधरी आणि मनमोहन सामल यांची नियुक्‍ती करण्‍यात आली आहे. दिल्‍ली  महापालिका निवडणुकीतील पराभवानंतर आदेश गुप्ता यांनी पदाचा राजीनामा दिला होता. त्यांच्या जागी हंगामी अध्यक्ष वीरेंद्र सचदेवा यांना पूर्णवेळ अध्यक्ष करण्यात आले आहे. ( BJP Organisational Changes )

बिहार प्रदेशाध्‍यक्षपदी सम्राट चौधरी, विरोधकांसमोर आव्‍हान

बिहारच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्त झालेले सम्राट चौधरी सध्या विधान परिषदेचे आमदार आहेत. तसेच ते विरोधी पक्षनेतेही आहेत. २०१५ मध्ये भाजपमध्ये येण्यापूर्वी ते लालू यादव यांचा पक्ष राष्ट्रीय जनता दल, नितीश कुमार यांचा पक्ष जनता दल युनायटेड आणि जीतन राम मांझी यांचा पक्ष ‘हम’मध्‍येही होते. ते कुशवाह समाजातून आले आहेत, त्‍यांची प्रदेशाध्यक्षपदी नियुक्‍ती झाल्‍याने बिहारमध्‍ये नितीश कुमार यांच्या कोईरी-कुशवाह जातीच्या मतपेढीला तडा जाऊ शकतो, असे मानले जात आहे. बिहारच्या राजकारणात सम्राट चौधरी हे केंद्रीय गृहमंत्री नित्यानंद राय यांच्या जवळचे मानले जातात. ते स्वतः यादव जातीतून आलेले आहेत. राज्याची कमान सम्राट चौधरी यांच्याकडे देऊन भाजपने मागास-दलित व्होट बँकेला मदत करण्याचे संकेत दिले आहेत.

BJP Organisational Changes : राजस्‍थानमध्‍ये सीपी जोशींचीच निवड का?

भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने राजस्थानमधील चित्तोडगडचे दोन वेळा खासदार राहिलेले सीपी जोशी यांची प्रदेशाध्‍यक्ष म्हणून नियुक्ती केली आहे. यापूर्वी ते पक्षात उपाध्यक्ष म्हणून कार्यरत होते. अशोक पर्नामी प्रदेशाध्यक्ष असताना त्यांनी युवा मोर्चाचे अध्यक्ष म्हणूनही काम पाहिले आहे. ब्राह्मण समाजातून आलेल्या सीपी जोशी यांना प्रदेशाध्यक्ष करून भाजपने या समाजाला स्वतःशी जोडण्याचा प्रयत्न केला आहे. त्याच आठवड्यात केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी राज्यात ब्राह्मण परिषद घेऊन राज्याच्या राजकारणात ब्राह्मणांना योग्य प्रतिनिधित्व दिले जाईल, अशी ग्‍वाही दिली होती.

राजस्‍थानच्‍या माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे सिंधिया पुन्हा एकदा स्वत:ला मुख्यमंत्रीपदाच्या दावेदार म्हणून दाखवत आहेत, तर माजी प्रदेशाध्यक्ष सतीश पुनियाही या शर्यतीत पुढे असल्याचे बोलले जात आहे. पक्षातील इतर अनेक नेत्यांनीही आपापले गट स्थापन केले आहेत. या गटबाजीमुळे भाजपला निवडणुकीत नुकसान होऊ शकते. मात्र सीपी जोशी यांना प्रदेशाध्यक्ष बनवून भाजपने ही दुफळी थांबवण्याचा प्रयत्न केला आहे, कारण सीपी जोशी हे कोणत्याही गटाशी संबंधित असल्याचे दिसत नाही.

BJP Organisational Changes : वीरेंद्र सचदेवा यांच्‍यावर दिल्‍लीची जबाबदारी

नुकत्याच पार पडलेल्या दिल्ली महापालिका निवडणुकीत भाजपला दारुण पराभवाला सामोरे जावे लागले होते. येथे भाजप सलग १५ वर्ष सत्तेत होते. प्रदेशाध्यक्ष आदेश गुप्ता यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. यानंतर वीरेंद्र सचदेवा यांच्याकडे कार्याध्यक्ष म्हणून जबाबदारी आली. वीरेंद्र सचदेवा दीर्घकाळापासून पक्ष संघटनेत कार्यरत आहेत. त्यांनी मयूर विहार जिल्ह्याच्या अध्यक्षांसह पक्षाचे उपाध्यक्षपद भूषवले आहे. आता त्यांना पूर्ण प्रदेशाध्यक्ष करण्यात आले आहे.

ओडिशात पक्ष मजबूत करण्याचा प्रयत्नात

मनमोहन सामल यांच्याकडे भाजप ओडिशाची जबाबदारी देण्यात आली आहे. राज्यात नवीन पटनायक यांच्या राजकीय वर्चस्वाच्या वातावरणात पक्ष मजबूत करणे ही त्यांची पहिली जबाबदारी असेल. पक्ष संघटनेतून आलेले मनमोहन सामल हे केंद्रीय नेतृत्वाच्या जवळचे मानले जातात. त्यांची आदिवासी मतदारांवर असलेली मजबूत पकड राज्यात भाजपला मजबूत करण्यासाठी उपयुक्त ठरू शकते,अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

हेही वाचा :

 

 

Back to top button