Gold Price Hike : सोने प्रति १० ग्रॅम १० हजारांवरुन ६० हजारांवर..! जाणून घ्‍या मागील १७ वर्षांमधील दरवाढ | पुढारी

Gold Price Hike : सोने प्रति १० ग्रॅम १० हजारांवरुन ६० हजारांवर..! जाणून घ्‍या मागील १७ वर्षांमधील दरवाढ

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : जागतिक बाजारपेठेत कमकुवत स्थिती असतानाही सोने दराने मोठे झेप घेतली आहे. सोमवारी (दि.२०) सोन्याने ६० हजारांचा टप्पा ओलांडला. गोल्ड फ्युचर्स सोमवारच्या व्यवहारात प्रति १० ग्रॅम ६०,१०० रुपयांवर पोहोचले. सोने दराचा हा सर्वकालीन उच्चांक आहे. दरम्यान, सोमवारी दुपारी १ च्या सुमारास सोने ६०,०२० रुपयांवर व्यवहार करत होते. ( Gold Price Hike ) जाणून घेवूया मागील १७ वर्षांमध्‍ये सोनेदरात झालेल्‍या दरवाढी विषयी…

आता सोने दरात पुन्‍हा दरवाढ होण्‍यामागे काही आंतरराष्‍ट्रीय कारणंही आहेत. अमेरिका आणि युरोपमधील बँकिंग क्षेत्र संकटात आहे. त्‍याचा नकारात्‍मक परिणाम शेअर बाजारावर झाला आहे. त्‍यामुळे सोने पुन्‍हा एकदा भाव खावून जात आहे. आता तर ते उच्‍चांकी दरावर पोहचले आहे.

Gold Price Hike : सध्‍या सोने दरात का वाढ होत आहे?

गुंतवणूक तज्ज्ञांच्या मते सध्‍या सोने दरात असणार्‍या तेजीला अमेरिका आणि अन्‍य देशांमध्‍ये बँकिंग क्षेत्रसमोरील संकट, कमकुवत होणारा डॉलर आणि जागतिक पातळीवरील शेअर बाजारामधील चढ-उतार कारणीभूत आहेत. जेव्‍हा शेअर बाजार कोलमडतो तेव्‍हा गुंतवणूकदार सोने खरेदीकडे वळतात. त्‍यामुळेच मागील आठवड्यात प्रति १० ग्रॅम ५५ हजारांवर
व्‍यवहार करणारे सोने आता ६०हजार रुपयांच्‍या पार गेले आहे.

मागील १७ वर्षांमध्‍ये तब्‍बल ५० हजार रुपयांची वाढ

मागील १७ वर्षांमध्‍ये सोने किंमतही १० हजार ते ६० हजार रुपयांपर्यंत पोहचली आहे. मे २००६ मध्‍ये सोने प्रति १० ग्रॅम १० हजारु रुपये इमके होते. मागील दहा वर्षांमध्‍ये सोने दरात प्रति १० ग्रॅम तब्‍बल ५० हजार रुपये वाढ नोंदवली गेली आहे. मागील तीन वर्षांमध्‍ये सोने दराने तब्‍बल ३० हजारु रुपयांची वाढ अनुभवली आहे.

मागील १७ वर्षांमधील सोने दरवाढ

तारीख             वर्ष                 किंमत ( प्रति १० ग्रॅम )
५ मे               २००६                १०,०००
६ नोव्‍हेंबर       २०१०                 २०,०००
१ जून              २०१२                ३०,०००
३ जानेवारी       २०२०               ४०,०००
२२ जुलै           २०२०                ५०,०००
२० मार्च          २०२३                 ६०,०००

 

सोने दरात वाढ कायम राहण्‍याचे संकेत

गुंतवणूक तज्ज्ञांच्या मतानुसार, सोने दरातील वाढ यापुढेही कायम राहण्‍याचे संकेत मिळत आहेत. अमेरिकेतील मध्‍यवर्ती फेड रिझर्‍व्ह बॅक व अन्‍य देशांच्‍या केंद्रीय बँकांकडून व्‍याज दरात वाढ होत आहे. त्‍यामुळे बॅकिंग क्षेत्रासमोरील आव्‍हान वाढले आहे. याचा परिणाम शेअर बाजारावर होण्‍याची शक्‍यता आहे. त्‍यामुळे सोने दरातील वाढ कायम राहण्‍याचे संकेत मिळत आहे. मागील वर्षी रशिया आणि युक्रेन युद्ध सुरु झाल्‍याने सोने दरात घसरण झाली होती. मात्र २०२२ मधील दिवाळीनंतर सोने दराने पुन्‍हा एकदा वाढ अनुभवली आहे. तर मार्च २०२३ मध्‍ये उच्‍चांकी दर गाठला आहे.

हेही वाचा :

 

 

 

Back to top button