Gold Price Today | सोने दरात रेकॉर्ड ब्रेक वाढ, पहिल्यांदाच ६० हजार पार, जाणून घ्या नवे दर | पुढारी

Gold Price Today | सोने दरात रेकॉर्ड ब्रेक वाढ, पहिल्यांदाच ६० हजार पार, जाणून घ्या नवे दर

Gold Price Today : जागतिक बाजारपेठेत कमकुवत स्थिती असतानाही सोने दराने मोठे झेप घेतली आहे. MCX वर आज सोमवारी (दि.२०) सोन्याने ६० हजारांचा टप्पा ओलांडला. गोल्ड फ्युचर्स सोमवारच्या व्यवहारात प्रति १० ग्रॅम ६०,१०० रुपयांवर पोहोचले. सोने दराचा हा सर्वकालीन उच्चांक आहे. दरम्यान, दुपारी १ च्या सुमारास सोने ६०,०२० रुपयांवर व्यवहार करत होते. सोन्याच्या दरातील ही वाढ १.०७ टक्के म्हणजे ६३७ रुपयांची आहे.

गेल्या आठवडाभरात सोने आणि चांदी दरात वाढ झाली आहे. गेल्या आठवड्यात सोन्याचा दर ५.८५ टक्क्यांने वाढून प्रति १० ग्रँम ५९,४६१ वर पोहोचला होता. आता त्यात पुन्हा वाढ झाली आहे.

अमेरिकेतील बँकिंग क्षेत्रातील संकटामुळे सोने दराने उच्चांक गाठला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातही सोन्याच्या दरात तेजी आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोने दरात ६.४९ टक्के वाढ होऊन ते प्रति औंस १,९८८ डॉलरवर पोहोचले. तर एमसीएक्सवर चांदी दराने प्रति किलो ६८,७२० रुपयांची पातळी गाठली होती. हा ६ आठवड्यांच्या उच्चांकी दर होता. दरम्यान, चांदीचा दर ९.२२ टक्के वाढून ६८,६४९ रुपयांवर बंद झाला होता.

इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनच्या माहितीनुसार, आज सोमवारी (दि.२०) शुद्ध सोने म्हणजे २४ कॅरेटचा दर प्रति १० ग्रॅम ५९,६७१ रुपयांवर खुला झाला. तर २३ कॅरेट दर ५९,४३२ रुपये, २२ कॅरेट ५४,६५९ रुपये, १८ कॅरेट ४४,७५३ रुपये आणि १४ कॅरेट ३४,९०८ रुपयांवर होता. चांदीचा प्रति किलो दर ६८,२५० रुपयांवर आहे. (Gold Price Today)

गेल्या शुक्रवारी शुद्ध सोने म्हणजे २४ कॅरेटचा दर प्रति १० ग्रॅम ५८,२२० रुपयांवर होता. तर २३ कॅरेटचा दर ५७,९८७ रुपये, २२ कॅरेट ५३,३२९ रुपये, १८ कॅरेट ४३,६६५ रुपये, १४ कॅरेटचा दर ३४,०५८ रुपये होता. तर चांदीचा दर प्रति किलो ६६,७७३ रुपये होता.

१ एप्रिलपासून सोने दागिन्यांवर हॉलमार्क सहा अंकी कोड अनिवार्य

दरम्यान, केंद्र सरकारने सोने आणि दागिन्यांच्या खरेदी-विक्रीच्या नियमात बदल केला आहे. ३१ मार्च २०२३ नंतर हॉलमार्क युनिक आयडेंटिफिकेशन (HUID) विना सोन्याचे दागिने आणि सोन्याच्या कलाकृती विकल्या जाणार नाहीत. याचाच अर्थ हॉलमार्क सहा अंकी कोडविना सोन्याचे दागिने आणि सोन्याच्या कलाकृतींच्या विक्रीला १ एप्रिलपासून बंदी घालण्यात आली आहे.

हॉलमार्किंग हे सोन्याच्या शुद्धतेचे प्रमाणपत्र आहे. हे १६ जून २०२१ पर्यंत ऐच्छिक होते. त्यानंतर टप्प्याटप्प्याने सोन्याचे हॉलमार्किंग अनिवार्य करण्याचा निर्णय सरकारने घेतला. पहिल्या टप्प्यात २५६ जिल्ह्यांमध्ये हे अनिवार्य करण्यात आले. दुसऱ्या टप्प्यात आणखी ३२ जिल्ह्यांत हे अनिवार्य करण्यात आले. आता एकूण २८८ जिल्ह्यांत हॉलमार्किंग अनिवार्य करण्यात आले आहे. यात आणखी आत ५१ जिल्हे जोडले जात आहेत.

शुद्ध सोने असे ओळखा?

सराफा बाजारात २४ कॅरेट सोने सर्वांत शुद्ध सोने समजले जाते. मात्र दागिने बनविण्यासाठी २२ कॅरेट सोन्याचा वापर केला जातो. त्यात ९१.६६ टक्के सोने असते. दागिन्यांच्या शुद्धतेसाठी हॉलमार्क संबंधित ५ चिन्हे असतात. २४ कॅरेट सोन्यावर ९९९, जर २२ कॅरेट सोन्याचा दागिना असेल तर त्यावर ९१६, २१ कॅरेट दागिन्यावर ८७५ आणि १८ कॅरेट सोन्याच्या दागिन्यावर ७५० असे लिहिलेले असते. जर दागिना १४ कॅरेटचा असेल तर त्यावर ५८५ असे लिहिलेले असते.

हे ही वाचा :

Back to top button