मुंबई : केंद्र सरकारकडून सोने खरेदीच्या नियमांमध्ये बदल करण्यात येणार आहे. एक एप्रिलपासून हे बदल करण्यात येणार आहेत. यामुळे ज्वेलर्स आणि ग्राहकांवर परिणाम होणार आहे. 31 मार्चनंतर हॉलमार्क असलेले सोनेच वैध मानले जाईल. हॉलमार्क नसलेले सोने अवैध असेल.
ग्राहक व्यवहार मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, 31 मार्चपासून सोने खरेदी करण्याच्या नियमांमध्ये हा बदल करण्यात येईल. हॉलमार्क युनिक आयडेंटिफिकेशन (एचयूडी) चिन्हाशिवाय कोणताही ज्वेलर सोन्याचे दागिने विकू शकणार नाही. देशात बनावट दागिन्यांची विक्री आणि ग्राहकांची फसवणूक रोखण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता फक्त सहा अंकी हॉलमार्क वैध ठरणार असल्याचे ग्राहक व्यवहार मंत्रालयाने म्हटले आहे. चार अंकी आणि सहा अंकी हॉलमार्क गोंधळामुळे मंत्रालयाने हे स्पष्ट केले आहे. त्यामुळे सहा अंकी हॉलमार्कशिवाय सराफांना सोन्याचे दागिने विकता येणार नाहीत.
आता चार अंकी हॉलमार्क पूर्णपणे बंद करण्यात येतील. बनावट सोन्याची विक्री रोखण्यासाठी केंद्र सरकारकडून बर्याच काळापासून प्रयत्न सुरू आहेत. 'एचयूडी' म्हणजे 'हॉलमार्क युनिक आयडेंटिफिकेशन' क्रमांक. या क्रमांकावरून सोन्याची गुणवत्ता आणि शुद्धता समजते. सोन्याचे दागिने किंवा वस्तूवर हा क्रमांक असतो. या नंबरवरून सोन्याच्या दागिन्याबाबत संपूर्ण माहिती समजते. याआधी चार अंकी आणि सहा अंकी हॉलमार्क क्रमांक होते; मात्र आता सरकारने चार अंकी हॉलमार्कवर बंदी घातली असून फक्त सहा अंकी हॉलमार्क वैध ठरणार आहे. ग्राहकांना हॉलमार्कशिवाय जुने सोन्याचे दागिने विकता येणार आहेत. देशभरात एकूण 1 हजार 338 हॉलमार्किंग केंद्रे असून आणखी केंद्रे उभारली जात आहेत.