#priyanka gandhi : उत्तर प्रदेश पाेलिसांनी गेस्ट हाऊसलाच जाहीर केले जेल | पुढारी

#priyanka gandhi : उत्तर प्रदेश पाेलिसांनी गेस्ट हाऊसलाच जाहीर केले जेल

लखनौ, पुढारी ऑनलाईन:

लखीमपूर खेरी येथे शेतकऱ्यांच्या हत्येप्रकरणी भेट घेण्यासाठी निघालेल्या प्रियांका गांधी ( #priyanka gandhi )  यांना तब्बल ३४ तास ताब्यात ठेवल्यानंतर पोलिसांनी अटक दाखविली आहे. त्यांना एका गेस्ट हाऊसमध्ये ठेवण्यात आले असून, त्या गेस्ट हाऊसलाच जेल घोषित केले आहे. प्रियांका गांधी ( #priyanka gandhi ) यांचे भेट घेण्यासाठी निघालेले छत्तीसगढचे मुख्यमंत्री भूपेंद्र बघेल यांना लखनऊ विमानतळावर अडविल्याने त्यांनी तेथेच धरणे आंदोलन सुरू केले आहे.

प्रियांका गांधी यांना उत्तर प्रदेश पोलिसांनी तब्बल ३४ तासानंतर अटक दाखविली आहे. काही तासांपूर्वी त्यांनी एक व्हिडिओ शेअर केला असून त्यात पोलिसांच्या दडपशाहीबद्दल आवाज उठवला होता.

उत्तर प्रदेश पोलिसांनी प्रियांका गांधी यांच्यासोबत १० लोकांवर शांतता भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये काँग्रेसचे नेते दिपेंद्र हुड्डा आणि अजय कुमार लल्लू यांचा समावेश आहे.

प्रियांका गांधी या लकीमपूर खिरी येथे जात असताना त्यांना सीतापूर येथील हरगावमध्ये अटक करण्यात आली. त्यांना एका प्राथमिक आरोग्य केंद्राच्या गेस्ट हाऊसमध्ये ठेवण्यात आले असून या गेस्ट हाऊसला जेल घोषित केले आहे.

प्रियांका गांधी यांना केलेल्या अटकेवरून सरकारवर टीका होत होती. त्यांना ज्या गेस्ट हाऊसमध्ये अटक करून ठेवले होते, त्या गेस्ट हाऊसची साफसफाई करतानाचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. तसेच त्यांनी त्यांचा एक व्हिडिओ व्हायरल केला असून त्यात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना काही प्रश्न विचारले आहेत.

‘नरेंद्र मोदी सर, तुमच्या सरकारने मला कुठल्याही आदेशाशिवाय, एफआयआरशिवाय मागील २८ तासांपासून पाेलिसांनी मला ताब्‍यात ठेवले आहे. मात्र, शेतकऱ्यांना चिरडणारे आरोपी मोकाट फिरत आहेत. त्यांना का अटक केली नाही? ’, असा सवालही त्‍यांनी केला आहे.

लखनौच्या विमानतळावर भूपेश बघेल यांचे आंदोलन

प्रियांका गांधी यांना अटक केल्यानंतर छत्तीसगढ भूपेश बघेल हे लखनौला पोहोचले. त्यांना विमानतळावरच रोखण्‍यात आले. त्यानंतर आक्रमक झालेल्या बघेल यांनी तेथेच ठिय्या आंदोलन सुरू केले.

बघेल म्हणाले, मी प्रियांका गांधी यांना भेटण्यासाठी सीतापूर येथे जात होतो, पण मला विमानतळाबाहेर जाऊ दिले गेले नाही.

काँग्रेसचे नेते पी. चिदंमबरम म्हणाले, हे पूर्णपणे बेकायदा आणि मान खाली घालायला लावणारे आहे. त्यांना पहाटे साडेचार वाजता एका पुरुष अधिकाऱ्याने अटक केली आहे. त्यांना कोर्टासमोर हजरही केले नाही.

हेही वाचलं का ? 

Back to top button