K. Kavitha: के.कविता यांच्या ‘ईडी’ चौकशीनंतर हैदराबादमध्ये ‘पोस्टर वॉर’ | पुढारी

K. Kavitha: के.कविता यांच्या 'ईडी' चौकशीनंतर हैदराबादमध्ये 'पोस्टर वॉर'

पुढारी ऑनलाईन : तेलंगणाचे मुख्यमंत्री व भारत राष्ट्र समितीचे (BRS) नेते के. चंद्रशेखर राव  यांची कन्‍या के. कविता यांना  दिल्ली मद्य घोटाळाप्रकरणी ‘ईडी’ने  समन्स बजावले होते. याप्रकरणी आज के. कविता दिल्लीतील ईडी कार्यालयात चौकशीसाठी हजर झाल्या. दरम्‍यान, या चौकशीचे पडसाद हैदराबादमध्‍ये उमटले. संतप्त कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात पोस्टबाजी, निदर्शने करत, केंद्र सरकारवर हल्लाबोल केला.

के. कविता या ‘ईडी’च्या चौकशीला सामोरे गेल्यानंतर हैद्राबादमध्ये भाजपमध्ये प्रवेश केलेल्या वेगवेगळ्या राज्यातील अनेक नेत्यांची खिल्‍ली उडविणारी पोस्टर्स शहरात लावण्यात आली आहेत. के. कविता यांच्या समर्थकांनी लावलेल्या पोस्टर्समध्ये भाजपमध्ये सामील झालेल्या नेत्‍यां आणि के. कविता यांच्यावर ‘रेड डिटर्जंट’चा काय प्रभाव झाला हे दाखवण्यात आले आहे. भाजप नेत्यांच्या टी-शर्टचा रंग भगवा झाल्‍याचे तर  के. कविता याच्या कपड्यांचा रंग अबाधित राहिल्याचे या पोस्‍टरवर नमूद करण्‍यात आले आहे. ‘#बाय बाय मोदी’ असा हॅशटॅग देखील वापरण्यात आला आहे.

ईडीने के.कविता यांना ९ मार्चला चौकशीसाठी उपस्थित राहण्यास सांगितले होते; पण दिल्ली येथे नियोजित महिला आरक्षणासाठीच्या उपोषण आंदोलनाचा हवाला देत त्‍यांनी ११ मार्चला चौकशीला हजर राहत असल्याचे कळवले होते. दरम्यान, के.कविता यांना समन्स बजावल्यानंतर भारत राष्ट्र समिती (BRS) कार्यकर्ते आणि समर्थकांनी तेलंगणाचे मुख्यमंत्री आणि पक्षप्रमुख के. चंद्रशेखर राव यांच्या निवासस्थानाबाहेर मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन केले होते.

हेही वाचा:

Back to top button