Delhi liquor scam: तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या मुलीला ईडीकडून समन्स | पुढारी

Delhi liquor scam: तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या मुलीला ईडीकडून समन्स

पुढारी ऑनलाईन: तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांची मुलगी के. कविता यांना ईडीने (अंमलबजावणी संचालनालयाने-ED) समन्स बजावले आहे. दिल्ली मद्य घोटाळाप्रकरणी भारत राष्ट्र समिती (BRS) नेत्या के. कविता यांची चौकशी करण्यात येणार आहे. याप्रकरणी तिला उद्या गुरूवारी ९ मार्चला चौकशीसाठी बोलावण्यात आले असल्याचे माहिती समोर येत आहे. कविता दक्षिणेतील मद्य कार्टेलचा प्रमुख भाग असून मद्य घोटाळ्यात त्यांनी मोठा फायदा करून घेतला असल्याचा तपास संस्थांचा संशय आहे.

यापूर्वी दिल्ली मद्य घोटाळाप्रकरणी १२ डिसेंबर रोजी सीबीआयने भारत राष्ट्र समिती (BRS) नेत्यांची हैदराबादमध्ये सात तासांहून अधिक काळ चौकशी केली होती. तसेच याप्रकरणात दिल्लीच्या एका न्यायालयाने हैदराबादस्थित व्यापारी अरुण रामचंद्र पिल्लई याला १३ मार्चपर्यंत ईडी कोठडी तर मद्यविक्रेते अमनदीप धल्ल याला २१ मार्चपर्यंत न्यायालयीन कोठडीत पाठवल्यानंतर कविताला समन्स बजावण्यात आला आहे.

दरम्यान ईडीने बजावलेल्या समन्सवर प्रतिक्रिया देताना के. कविता यांनी आपल्यावरील आरोप फेटाळले असून कायदेशीर सल्ला घेत असल्याचे म्हटले आहे. तपास संस्थांना सहकार्य करणार असल्याचे सांगतानाच केंद्रातील सत्ताधारी लोक विरोधी पक्षांना प्रताडीत करण्यासाठी तपास संस्थांचा दुरुपयोग करत असल्याचा आरोप कविता यांनी केला.

दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे ज्येष्ठ नेते मनीष सिसोदिया यांना केंद्रीय अन्वेषण विभागाने या प्रकरणी अटक केल्यानंतर हे समन्स जारी करण्यात आले आहेत. सिसोदिया यांना 26 फेब्रुवारी रोजी अबकारी धोरण तयार करण्यात आणि अंमलबजावणीमध्ये कथित अनियमिततेशी संबंधित प्रकरणाच्या चालू तपासात अटक करण्यात आली होती. त्यानंतर दिल्लीच्या राऊस अॅव्हेन्यू कोर्टाने त्यांना 20 मार्चपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

हेही वाचा:

Back to top button