लखिमपूर घटनेनंतर नेत्यांचे अटकसत्र

लखिमपूर घटनेनंतर नेत्यांचे अटकसत्र
Published on
Updated on

लखिमपूर ; वृत्तसंस्था : लखिमपूर खिरी येथील शेतकरी आंदोलनाला लागलेल्या हिंसक वळणातील मृतांची संख्या आता 9 झाली आहे. रविवारच्या हिंसाचारात 8 जण मरण पावले होते. लखिमपूर हिंसाचाराच्या घटनेपुरता शेतकरी आंदोलक आणि सरकारमध्ये तोडगा निघाला आहे. सरकारने मृत शेतकर्‍यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 45 लाख रुपये भरपाई जाहीर केली आहे.

दरम्यान, जमावबंदी लागू असताना लखिमपूरच्या दिशेने निघालेल्या काँग्रेसच्या महासचिव प्रियांका गांधी, समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अनेक अन्य नेत्यांना त्यांच्या घरातच अटक करण्यात आली आहे. लखिमपूरला जाताना पोलिसांनी रोखताच अखिलेश यादव त्यांनी लखनौमध्ये रस्त्यावरच धरणे आंदोलन सुरू केले. यानंतर त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

सोमवारी सकाळी आंदोलक व सरकारदरम्यान झालेल्या चर्चेनुसार मृताच्या कुटुंबातील एका सदस्याला शासकीय सेवेत सामावून घेण्यात येणार आहे. घटनेच्या न्यायालयीन चौकशीचे तसेच जबाबदार सर्व आरोपींना 8 दिवसांत अटक करण्याचे आश्‍वासनही सरकारतर्फे देण्यात आले आहे. जखमींना प्रत्येकी 10 लाख रुपये देण्यात येणार आहेत.

लखिमपूरमध्ये राजकीय दौर्‍यांवर बंदी

लखिमपूर भागात सीआरपीसीचे कलम 144 लागू करण्यात आले आहे. विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांवर या जिल्ह्यात दौरा करण्यास बंदी घालण्यात आली आहे. शेतकरी संघटनेच्या नेत्यांना, कार्यकर्त्यांना मात्र अशी बंदी घालण्यात आलेली नाही.

मंत्री अजय मिश्रांच्या मुलावर गुन्हा

लखिमपूर हिंसा प्रकरणात केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा टेनी यांचा मुलगा आशिष मिश्रा याच्यासह 14 जणांवर गुन्हेगारी कट रचणे, दंगल घडविणे आदी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. बहराईच येथील नानपारातील रहिवासी जगजित सिंग यांनी या प्रकरणी तिकुनिया पोलिस ठाण्यात तक्रार दिली. दुसरीकडे मंत्री अजय मिश्रा यांच्या वाहनचालकाने दिलेल्या तक्रारीवरून तिकुनिया पोलीस ठाण्यात अज्ञात शेततकर्‍यांविरुद्ध हल्ला, दंगल आणि मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मृतदेहांभोवती 700 वर शेतकरी

लखिमपुरात रविवारी मरण पावलेल्या शेतकर्‍यांचे मृतदेह अग्रसेन महाविद्यालयाबाहेर अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. सकाळपासूनच तेथे 700 वर शेतकरी जमले होते. यादरम्यानच भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत यांनी भरपाई, दोषींवर कारवाईबाबत मागण्या पुढे केल्या होत्या. दुसरीकडे रविवारी रात्रीच मंत्री अजय मिश्रा यांनी घटनास्थळी माझा मुलगा हजरच नव्हता, असा दावा केला आहे. ते म्हणाले की, शेतकर्‍यांमध्ये शिरलेल्या असामाजिक तत्त्वांनी भाजपच्या 3 कार्यकर्त्यांची हत्या केली. आमच्या एका वाहनचालकाला ठार केले.

लखनौत पोलिसांचे वाहन जाळले

अखिलेश जेथे धरणे देऊन बसले होते, तेथून जवळच जमावाने पोलिसांच्या वाहनाला आग लावली. अनेक नेत्यांना पोलिसांनी त्यांच्या घरातच अटक (हाऊस रेस्ट) केली आहे. बसप महासचिव सतीश मिश्रा, काँग्रेस नेते प्रमोद तिवारी, सलमान खुर्शीद, आराधना मिश्रा आणि शिवपाल यादव यांचा त्यात समावेश आहे.

खालिस्तानवाद्यांचा कट!

विघटनवादी, फुटीरवादी टी-शर्ट घातलेल्या लोकांनीच लखिमपूर खिरी येथे आगळीक केली. हे लोक नेत्यांच्या वाहनांच्या दिशेने धावून आले. पोलिसांकडूनही ते रोखले जात नव्हते. त्यांच्याकडे लाठ्या-काठ्या व शस्त्रास्त्रे होती. ज्यांनी वाहनांवर हल्ले चढविले, त्या सर्व जणांच्या टी-शर्टवर भिंद्रनवाले या मृत दहशतवाद्याचे चित्र होते.

या घटनेचे अनेक व्हिडीओ आणि छायाचित्रे व्हायरलही झाली आहेत. भिंद्रनवाले हा स्वतंत्र खालिस्तानची मागणी करणारा आणि त्यासाठी पंजाबात हजारो हिंदूंचे हत्याकांड घडविणारा पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी होता.

त्याचा आणि शेतकरी आंदोलनाचा काय संबंध, असा सवाल यावरून उपस्थित केला जात आहे. लखिमपूर येथील हिंसाचार हा भारताविरुद्ध आंतरराष्ट्रीय स्वरूपाच्या कटाचा भाग असू शकतो, असा संशय आता घेतला जात आहे. भिंद्रनवाले याचा खात्मा भारतीय लष्कराने केला होता.

अशा घटनांची कुणी जबाबदारी घेत नाही

दरम्यान, सर्वोच्च न्यायालयात किसान महापंचायतच्या याचिकेवर सुनावणीदरम्यान अ‍ॅटर्नी जनरल के. के. वेणुगोपाल यांनी लखिमपूर खिरीच्या घटनेचा उल्लेख करीत अशा प्रकारच्या दुर्दैवी घटना घडू नयेत अशी भावना व्यक्‍त केली. अशा घटना घडतात तेव्हा कुणीही जबाबदारी घेत नाही, असे मत न्यायमूर्ती ए. एम. खानविलकर तसेच न्यायमूर्ती सी. टी. रविकुमार यांच्या खंडपीठाने यावेळी व्यक्‍त केले. किसान महापंचायतने जंतर-मंतरवर सत्याग्रह करण्याची परवानगी मागितली आहे.

यावर विचार करू, असे मत सुनावणीदरम्यान न्यायालयाने व्यक्‍त केलेे. किसान महापंचायतने केंद्र सरकार, नायब राज्यपाल तसेच दिल्ली पोलीस आयुक्‍तांना प्रतिवादी करीत अधिकार्‍यांना निर्देश जारी करण्याची मागणी करणारी ही याचिका न्यायालयात दाखल केली आहे.

प्रियांका यांचा पोलिसांशी वाद

प्रियांका या मार्ग बदलून लखिमपूरला निघाल्या होत्या. पण पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर प्रियांका भडकल्या. संतापात त्या पोलिसांना म्हणाल्या, 'आम्हाला अटक करा. आनंदच होईल.पण हे धक्‍काबुक्‍की करणे कोणत्या कायद्यात बसते? जमावबंदी लागू आहे ना? आम्ही तर दोनच जण आहोत. जमाव कुठे आहे? आम्ही अश्रू पुसायला जातोय, हा काही गुन्हा नाही. गुन्हा तुम्ही (पोलीस) करताय.

'फिजिकल असॉल्ट', 'टेम्प्ट टू किडनॅप', 'किडनॅप', 'टेम्प्ट टू मॉलेस्ट', 'टू हार्म' अशी कलमे तुमच्यावर लागायला हवीत. मला हात लावून दाखवा. अधिकार्‍यांकडून, मंत्र्यांकडून वॉरंट आणा आधी, मग मला अटक करा. महिला पोलिसांना पुढे करू नका', अशा शब्दांत प्रियांका यांनी पोलिसांची कानउघाडणी केली. पोलीस अधिकारी कर्मचार्‍यांना उद्देशून एकच वाक्य बोलले, 'यांना (प्रियांका गांधी) अटक करा..!'

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news