नागरी नियोजन अन् शहरी प्रशासनाचा शहर विकासात मोठा वाटा- पीएम मोदी | पुढारी

नागरी नियोजन अन् शहरी प्रशासनाचा शहर विकासात मोठा वाटा- पीएम मोदी

पुढारी ऑनलाईन : नवीन शहरांचा विकास आणि जुन्या शहर प्रणालींचे आधुनिकीकरण हे भारतातील शहरी विकासाचे मुख्य पैलू आहेत. 21 व्या शतकात भारताचा ज्या वेगाने विकास होत आहे, त्यादृष्टीने येणाऱ्या काही काळात अनेक नवीन शहरे वसणार आहेत. त्यामुळे उत्तम नागरी नियोजन आणि शहरी प्रशासन या दोन्हींचा शहर विकासात मोठा वाटा असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केले आहे. पोस्ट बजेटनंतर ‘शहरी नियोजन, विकास आणि स्वच्छता’ या विषयावर व्हिडिओ कॉन्फरन्सिद्वारे ते संवाद साधत होते.

पुढे बोलताना ते म्हणाले, स्वातंत्र्यानंतर देशात मोजकीच नियोजित शहरे उभी राहिली हे आपले दुर्दैव आहे. स्वातंत्र्याच्या 75 वर्षात 75 नवी आणि मोठी नियोजित शहरे वसवली असती तर आज भारताचे चित्र वेगळे दिसले असते, अशी खंत पीएम मोदीनी व्यक्त केली. आपल्या देशात दररोज हजारो टन महापालिका कचरा निर्माण होतो. 2014 मध्ये देशात केवळ 14-15% कचऱ्यावर प्रक्रिया केली जात होती, पण आज 75% कचऱ्यावर प्रक्रिया केली जात आहे. आपली नवीन शहरे कचरामुक्त, पाणी सुरक्षित आणि हवामानास अनुकूल असावीत. त्यासाठी टियर 2 आणि टियर 3 शहरांमध्ये शहरी पायाभूत सुविधा आणि नियोजनात गुंतवणूक वाढवावी लागेल. हे जर पूर्वी घडले असते तर आपल्या शहरांच्या किनारे कचऱ्याच्या डोंगरांनी भरले नसते.

जेव्हा नियोजन चांगले असेल तेव्हाच आपली शहरे हवामान लवचिक आणि जलसुरक्षित बनतील. अमृतकालमध्ये शहरी नियोजन आपल्या शहरांचे भवितव्य ठरवेल, तर भारतातील सुनियोजित शहरेच भारताचे भवितव्य ठरवतील. त्यामुळे आमच्या सरकारने प्रत्येक अर्थसंकल्पात शहरी विकासावर भर दिला आहे. सध्याच्या अर्थसंकल्पात त्यासाठी महत्त्वपूर्ण रक्कम मंजूर करण्यात आली आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा:

Back to top button