

पुढारी ऑनलाईन डेस्क : २०२४ मध्ये होणार्या लोकसभा निवडणुकीसाठी सत्ताधारी भाजपसह विरोधी पक्षांनी तयारी सुरु केली आहे. एकीकडे काँग्रेस विरोधकांना एकजुटीचे आवाहन करत आहे. तर दुसरीकडे या आव्हानांचा मुकाबला करण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे. आता आगामी लोकसभा निवडणूक भाजपने पक्षाच्या महिला मोर्चाकडे ( BJP Mahila Morcha ) एक नवी जबाबदारी सोपविली आहे. मोदी सरकारने आपल्या कार्यकाळात केलेल्या विकास कामांची माहिती देशभरात एकाचवेळी देण्याची जबाबादारी भाजप महिला मोर्चा पार पाडणार आहे.
केंद्र सरकारच्या विविध कल्याणकारी योजनांच्या लाभार्थी महिलांशी संपर्क साधण्यासाठी भाजपची महिला शाखा सोमवारपासून ( दि. २७ ) देशव्यापी मोहीम सुरू करणार आहे. केंद्र सरकारच्या विविध कल्याणकारी योजनांच्या महिला लाभार्थ्यांशी संपर्क साधला जाईल. अधिकाधिक महिलांना पक्षाशी जोडणे आणि वर्षभरात त्यांच्यासोबत एक कोटी सेल्फी घेणे, असे या योजनेचा उद्देश आहे.
या मोहिमेबाबत माहिती देताना भाजप महिला मोर्चाच्या प्रमुख वनाथी श्रीनिवासन यांनी सांगितले की, पक्षाच्या महिला शाखा मार्चमध्ये भाजपच्या दिवंगत नेत्या सुषमा स्वराज यांच्या नावाने पुरस्कार वितरण समारंभ सुरू करेल. विविध क्षेत्रांमध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिलेल्या प्रत्येक जिल्ह्यातील १० महिलांचा सत्कार केला जाईल. सरकारी योजनांचा लाभ झालेल्या महिलांचा सेल्फी घेणे हा महिलांशी जोडण्याच्या पक्षाच्या प्रयत्नांचा एक भाग असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
पक्षाच्या महिला शाखेच्या सदस्य प्रत्येक जिल्ह्यातील महिला मतदारांशी संपर्क साधतील. त्यांना घरगुती स्वयंपाकाचा गॅस, शौचालय आणि बँक खाती उघडण्यापर्यंतच्या विविध सरकारी योजनांच्या फायद्यांविषयी माहिती देतील. या महिलांना कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ मिळाला असेल तर पक्षाचे सदस्य त्यांना त्यांच्यासोबत सेल्फी काढण्याची विनंती करतील, असेही वनाथी श्रीनिवासन यांनी सांगितले.
श्रीनिवासन म्हणाले की, "जर एखाद्या महिलेला सरकारच्या योजनेचा फायदा झाला असेल तर पक्षाचे सदस्य तिच्यासोबत सेल्फी घेण्याची विनंती करतील. हे सेल्फी नमोॲपद्वारे अपलोड केले जातील. इतर योजनांबरोबरच या योजना लोकप्रिय होण्यासही या कार्यक्रमामुळे मदत होईल."
हेही वाचा :